
रोहतवाडी (ता. पाटोदा) येथील संगीता व प्रभाकर या दाम्पत्याला चारही मुलीच आहेत. काही कारणांमुळे नोकरी गमावावी लागल्यानंतर प्रभाकर हे पत्नी संगीता यांच्या मदतीने शेती, घरगुती व्यवसाय करतात. आयुष्यातल्या अनेक चढ उतारानंतर त्यांनी मुलींना शिकविण्याच्या आणि डॉक्टर करण्याच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली.
बीड : मध्यवर्गीय दाम्पत्याने कधीही मुलगाच व्हावा अशी धडपड केली नाही. चारही मुलींना शिकविण्याची धडपड आणि मुलींनीही आई - वडिलांच्या कष्टाचे चीझ करत वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळविला. दोघींचे वैद्यकीय शिक्षण सुरु असून आता जुळ्या दोघींचाही एमबीबीएस शिक्षणासाठी प्रवेश निश्चित झाला. मात्र, भरमसाठ शुल्काची रक्कम जमा करताना वनवे दाम्पत्याची दमछाक होत आहे. चारही मुलींना डॉक्टर करण्याच्या त्यांच्या जिद्दीत आणि मुलींच्या स्वप्नात परिस्थितीचा स्पिड ब्रेकर आला आहे.
रोहतवाडी (ता. पाटोदा) येथील संगीता व प्रभाकर या दाम्पत्याला चारही मुलीच आहेत. काही कारणांमुळे नोकरी गमावावी लागल्यानंतर प्रभाकर हे पत्नी संगीता यांच्या मदतीने शेती, घरगुती व्यवसाय करतात. आयुष्यातल्या अनेक चढ उतारानंतर त्यांनी मुलींना शिकविण्याच्या आणि डॉक्टर करण्याच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मुलींनीही आई - वडिलांच्या कष्टाचे चिझच केले. पहिली मुलगी प्रतिक्षा हीने चांगले गुण मिळवून दंतवैद्यक (बीडीएस) प्रवेश मिळविला. तर, दुसरी मुलगी प्रिती देखील वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेत चांगले गुण मिळवून एमबीबीबीएस प्रवेशासाठी पात्र ठरली.
प्रतिक्षा श्री. चव्हाण मेमोहिरअल मेडिकल अॅन्ड रुरल डेव्हलोपेंट फाऊंडेशनच्या दंत वैद्यकीय महाविद्यालयात अंतिम वर्षाला असून प्रिती सावर्डे (चिपळूण) येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तृतीय वर्षात शिकत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या शेवटच्या जुळ्या निकीता व प्रणिता यांनीही यंदाच्या वैद्यकीय पूर्व परीक्षेत चांगले गुण मिळविले. प्रणिताला नीट परीक्षेत ५२७ गुण मिळाले आणि तीचा एसएसपीएम मेडिकल कॉलेज कुडाळ (सिंधुदुर्ग) येथे एमबीबीएससाठी प्रवेश निश्चित झाला. तर, निकीतानेही नीट परीक्षेत ५४० गुण मिळवून पुणे येथील काशिबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस शिक्षणासाठी प्रवेशासाठी पात्र ठरली.
मात्र, सामान्य वनवे कुटूंबियांना पहिल्या दोन मुलींच्या शिक्षणासाठीच पाच एकरांतील तीन एकर जमीन विकावी लागली. आता दोन एकरात गुजराण आणि मुलींचे शिक्षण अशी दुहेरी कसरत त्यांना करावी लागत आहे. या दोघी एमबीबीएस शिक्षणासाठी पात्र ठरल्या असल्या तरी दोघींचे १६ लाख रुपये शुल्क भरल्यानंतर त्यांचे प्रवेश निश्चित होणार आहेत. नातेवाईक, दानशूर, मित्रपरिवार आणि स्वत: असे त्यांनी दहा लाख रुपयांची जुळवाजुळवही केल्याचे प्रभारकराव सांगतात.
आता वनवे कुटूंबिय एका कसोटीच्या काळाचा सामना करत आहे. यासाठी त्यांना फक्त दानशूरांच्या मदतीच्या हाताची गरज आहे. पण एकतर चारही मुलीच आणि चौघीनाही डॉक्टर करण्याची जिद्द संगीता आणि प्रभाकर वनवे यांच्यात आहे. त्यांच्या जिद्दीला आणि मुलींच्या हुशारी आणि मेहनतीला सलामच म्हणावे लागेल.
संपादन - सुस्मिता वडतिले