घराणेशाहीची सर्वच पक्षांना लागण 

हरी तुगावकर - सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

लातूर - प्रत्येक निवडणुकीत घराणेशाही हा कळीचा मुद्दा असतो; पण प्रत्येक नेता आपल्या घरातील सदस्य कोणत्या पद्धतीने राजकारणात येईल, हे नेहमीच पाहत असतो. जिल्हा परिषदेच्या  निवडणुकीत तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व भारतीय जनता पक्षही त्याला अपवाद राहिलेला  नाही. या निवडणुकीत पत्नी, मुलगा, भाऊ, सुनेला निवडून आणण्यासाठी या पक्षातील नेत्यांची मात्र मोठी  दमछाक होताना दिसत आहे. 

लातूर - प्रत्येक निवडणुकीत घराणेशाही हा कळीचा मुद्दा असतो; पण प्रत्येक नेता आपल्या घरातील सदस्य कोणत्या पद्धतीने राजकारणात येईल, हे नेहमीच पाहत असतो. जिल्हा परिषदेच्या  निवडणुकीत तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व भारतीय जनता पक्षही त्याला अपवाद राहिलेला  नाही. या निवडणुकीत पत्नी, मुलगा, भाऊ, सुनेला निवडून आणण्यासाठी या पक्षातील नेत्यांची मात्र मोठी  दमछाक होताना दिसत आहे. 

माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांचे बंधू धीरज देशमुख हे एकुर्गा गटातून  निवडणूक लढवीत आहेत. गेल्या काही वर्षांपासून धीरज देशमुख हे युवक कॉंग्रेसमध्ये काम करीत आहेत. त्यात जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी सुटले आहे. त्यामुळे या पदावर श्री. धीरज देशमुख यांचा दावा आहे. कॉंग्रेसच्या वतीने सध्या तरी ग्रामीण भागातील फ्लेक्‍सवर कॉंग्रेसच्या  नेत्यांसोबतच आवर्जून धीरज देशमुख यांचा फोटो लावला जात आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्‍याने  धीरज देशमुख कसे विजयी होतील, याचा प्रयत्न आमदार देशमुख यांच्याकडून केला जात आहे. 

कॉंग्रेसचेच माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांची पत्नी व विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा पाटील कव्हेकर या निवळी गटातून निवडणूक लढवीत आहेत. कॉंग्रेसने माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर व आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ याच गटातून फोडला. 

पक्षांतर्गत विरोध असल्याने श्री. कव्हेकर यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. कॉंग्रेसचेच माजी आमदार वैजनाथ शिंदे यांचा मुलगा दत्तात्रय शिंदे हे लातूर तालुक्‍यातील काटगाव गणातून पंचायत समितीच्या सभागृहात जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. ग्रामीण भागात असलेल्या आपल्या संपर्काच्या जोरावर श्री. शिंदे यांनी आपल्या मुलासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. उदगीर तालुक्‍यातील भाजपचे माजी आमदार गोविंद केंद्रे यांचा मुलगा राहुल केंद्रे हे लोहारा गटातून निवडणूक लढवीत आहेत. श्री. केंद्रे हे मुंडे गटाचे मानले जातात. मुलाला निवडून आणण्यासाठी श्री. केंद्रे यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. 

एकेकाळी औसा तालुक्‍यावर माजी आमदार दिनकर माने यांचे वर्चस्व राहिलेले आहे; पण गेल्या काही वर्षांपासून ते अलिप्त राहिले. त्यात जिल्ह्याच्या संपर्कप्रमुखपदी संजय सावंत आल्यापासून ते शिवसेनेपासून दूरच होते. ते इतर पक्षात प्रवेश करणार याच्या चर्चा जिल्हाभर सुरू होत्या; पण अखेर त्यांनी पुन्हा शिवसेनेशी जुळवून घेतले. यातून त्यांनी औसा पंचायत समितीच्या आशिव गणातून आपली सून सदिच्छा माने यांना निवडणुकीसाठी उभे केले आहे. त्यांच्या विजयासाठी श्री. माने यांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार बाबासाहेब पाटील यांनी बंधू मंचकराव पाटील यांना शिरूर ताजबंद गटातून उमेदवारी दिली. अहमदपूर तालुक्‍यातील शिरूर ताजबंदमध्ये श्री. पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे भावाच्या विजयासाठी श्री. पाटील यांनी आपली शक्ती पणाला लावली आहे. नेत्यांनी मंत्री, आमदार व्हायचे अन्‌ नातेवाइकांनी जिल्हा परिषद पंचायत समितीत राज करायचे. त्यामुळे कार्यकर्त्यापेक्षा नातेवाइकांच्या मतदारसंघावर अधिक लक्ष देण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.

Web Title: All parties pursuing 'Hereditary Politics