‘या’ आमदाराकडून दोनशे कुटुंबांना राशन किटचे वाटप

धनंजय देशपांडे
Tuesday, 7 April 2020

आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी सर्वेक्षण करून शहरातील दोन हजार ४८० गरजू कुटुंबांची निवड करून अशा कुटुंबांना साधारण १५ दिवस पुरेल एवढे राशन वितरीत करण्याची योजना आखली. या कामाला मंगळवारी (ता.सात) सुरवात करत त्यांच्या निवासस्थानी तब्बल दोनशे कुटुंबप्रमुखांना राशन किटचे वाटप केले.

पाथरी (जि.परभणी) : लॉकडाउन काळात हातावर पोट असलेल्या शहरातील अडीच हजार गरीब कुटुंबांची उपासमार होऊ नये, या उदात्त हेतूने आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी त्या कुटुंबांना पंधरा दिवस पुरेल एवढे राशन देण्याच्या आखलेल्या योजनेची सुरवात मंगळवारी (ता. सात) तहसीलदारांच्या उपस्थितीत केली. जवळपास २०० कुटुंबप्रमुखांना सुरक्षित अंतराचे नियम पाळत राशन किटचे वाटप करण्यात आले.

कोरोना विषाणूच्या आजाराने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. तर त्यामुळे लॉकडाउन करण्यात आले असल्याने रोजनदारी करणाऱ्या मजूर वर्गाचे जास्त हाल होत आहेत. आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी सर्वेक्षण करून शहरातील दोन हजार ४८० गरजू कुटुंबांची निवड करून अशा कुटुंबांना साधारण १५ दिवस पुरेल एवढे राशन वितरीत करण्याची योजना आखली. या कामाला मंगळवारी सुरवात करत त्यांच्या निवासस्थानी तब्बल दोनशे कुटुंबप्रमुखांना तहसीलदार यू. एन. कागणे, नगर परिषदचे मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, प्रभारी पोलिस निरीक्षक बोधगिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राशन किटचे वाटप करण्यात आले. या वेळी मुंजाजीराव भाले, गंगाधरराव गायकवाड, बाजार समितीचे सभापती अनिल नखाते, चक्रधर उगले, माधवराव जोगदंड, बाळासाहेब कोल्हेंसह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
 
हेही वाचा - भाजीपाला, फळांची जागेवरच नासाडी

सुरक्षित अंतराचे नियम पाळून वाटप
गर्दी होऊ नये यासाठी नियोजन करून ठरून दिलेल्या दररोज २०० याप्रमाणे शहरातील एकूण दोन हजार ४८० गरजू कुटुंबांसाठी सुरक्षित अंतराचे नियम पाळून राशन किटचे वाटप करण्यात येणार आहे.

 

शासनाच्या आदेशाचे पालन करा
नागरिकांनी कोरोनाला घाबरून न जाता त्याला रोखण्यासाठी सुरक्षित अंतर, मास्क वापर व हात धुण्याचे नियम पळून शासनाच्या आदेशाचे पालन करावे.
- आमदार बाबाजानी दुर्राणी.

गुंज संस्थानकडून दीड लाखाची मदत
 गुंज (ता. पाथरी) येथील श्री योगानंद सरस्वती संस्थानकडून कोरोनासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश मंगळवारी (ता. सात) तहसीलदारांकडे सुपूर्द करण्यात आला. तालुक्यातील गुंज (खुर्द) येथील श्री योगानंद सरस्वती संस्थानचे मठाधिपती श्री राजेशभाई देसाई यांचे आज्ञेनुसार करोनासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश तहसीलदार यू. एन. कांगणे यांचेकडे संस्थानचे विश्वस्थ प्रशांतराव सोंनेकर व मकरंद दिग्ररस्कर यांनी सुपूर्द केला. या वेळी प्रवीण कुलकर्णी, विवेक सोंनेकर, मंडळ अधिकारी बिडवे, तलाठी आनंदीदास चौधरी आदींची उपस्थिती होती.

साई मंदिराकडून एक लाख...
कोरोना आपत्तीसाठी साई स्मारक समितीच्या वतीने अध्यक्ष सीताराम धानू यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश मंगळवारी (ता. सात) तहसीलदार यू. एन. कांगणे यांचेकडे सुपूर्द केला. या वेळी विश्वस्थ ॲड. अतुल चौधरी, गटविकास अधिकारी बी. टी. बायस, मंदिर व्यवस्थापक
एन. के. कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Allocation of ration kit to '200' families by 'this' MLA,parbhani news