आधिच मंदी त्यात संचारबंदी...! कुठे ते वाचा...?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जुलै 2020

परभणी- शहरात संचारबंदी लागू असल्याने संपूर्ण शहरात अश्या पध्दतीने सामसुम दिसत आहे.

परभणी: कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या चार महिण्यापासून बाजारपेठ सातत्याने बंद राहत आहे. लॉकडाऊनचे तीन महिणे व नंतर अनलॉक करून सुध्दा जिल्ह्यात सातत्याने लागू होणाऱ्या संचारबंदीमुळे शहरातील व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. बाजारपेठ सतत बंद राहत असल्याने व्यवहार कसे पुर्ण करावेत? हा प्रश्न व्यापाऱ्यांना आता सतावू लागला आहे.

परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणु संसर्ग झालेल्या रुग्णात गेल्या आठ दिवसापासून वाढ होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्कता बाळगत आहे. लोकांचा संपर्क कमी व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वारंवार निरनिराळ्या उपाय योजना केल्या जात आहेत. त्यात गेल्या चार दिवसापासून संचारबंदी लागू कऱण्यात आली आहे. परंतू या संचारबंदीमुळे शहरातील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सतत बाजारपेठ बंद राहत असल्याने त्यांचे व्यवहार पूर्ण कसे होणार याची चिंता त्यांना लागून राहीली आहे. सततच्या बंदमुळे शहरातील व्यापाऱ्यांचे हजारो कोटीचे नुकसान झाले आहे.

हेही वाचाखरिपाच्या पेरणीला मोसमी पावसाची साथसंगत
 
व्यापाऱ्यांचे मात्र मोठे वांदे झाले आहेत

मोठ्या व्यापाऱ्यांचे नुकसान लाखोत असले तरी दररोज कमाई करून उदरनिर्वाह चालविणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांचे मात्र मोठे वांदे झाले आहेत. यामुळे बाजारपेठ सुरु ठेवावी अशी मागणी आता व्यापाऱ्यामधून होत आहे. सतत इतके दिवस बाजारपेठ बंद ठेवणे शक्य नसल्याने प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये अशी ही मागणी करण्यात येत आहे.

बाजार बंद तरीही नागरीकांचा मुक्तसंचार

एकीकडे शहरात संचारबंदी लागू करून प्रशासनाने बाजारपेठ बंद ठेवली आहे. परंतू याचा विपरित परिणाम दिसून येत आहे. एकीकडे बाजारपेठ बंद तर दुसरीकडे संचार बंदी असतांनाही सर्वसामान्य लोक मात्र मोटारसायकलवरून बाजारात फिरत असल्याचे चित्र दिसत आहे. ही गर्दी थांबली पाहिजे या दृष्टीने प्रशासाने पावले उचलने गरजेच आहे.

येथे क्लिक करा - ‘या’ तालुक्यातील वन क्षेत्रात वन्यप्राण्यांचा वावर

प्रशासनाचे धोरण चुकीचे

आधी तीन महिण्याचे लॉकडाऊन व त्यानंतर सातत्याने संचारबंदीचे भूत व्यापाऱ्यांच्या मानगुटीवर बसवले जात आहे. एकीकडे व्यापाऱ्यांच्या गळ्याला सुरा ठेवायचा तर दुसरीकडे लोकांच्या शहरातील मुक्तसंचारावर धाक नाही हे धोरण चुकीचे आहे. बाजारपेठ संपविण्याचा घाटच प्रशासनाने घातला आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. हा प्रकार थांबला पाहिजे.
- सूर्यकांत हाके, जिल्हाध्यक्ष, व्यापारी महासंघ, परभणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Already recession, curfew Where to read it parbhani news