
बीड : अंबाजोगाई- लातूर रस्त्याचे चौपदरीकरण करा
बीड : जिल्ह्यातील बहुतांशी राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग दुपदरी असून अनेक रस्ते दुभाजक नसलेले व गावांच्या परिसरात स्पीड ब्रेकर नसलेले आहेत. परिणामी अपघातांचे सत्र सुरुच आहे. यातील अंबाजोगाई - लातूर मार्ग हा जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत दुपदरीच असल्याने अपघातांची संख्या अधिक आहे. हा रस्ता चौपदरी करावा, अशी मागणी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. डॉ. मुंडे यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे श्री. गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिले.
दरम्यान, जिल्ह्यातील रस्त्यांच्या समस्या, सुरळीत वाहतुकीसाठी नसलेल्या उपाययोजना (दुभाजक, वळण दाखविणाऱ्या खुणा, स्पीड ब्रेकर) आदींबाबत ‘सकाळ’ने सातत्याने बातम्यांतून पाठपुरावा केला. मागच्या पंधरवड्यात या रस्त्यावर एकाच वेळी अपघातात सात जणांचा मृत्यू झाला होता. तर, इतर मार्गांवरही अपघातांचे सत्र सुरुच आहे. अपघातांच्या इतर कारणांमध्ये अरुंद व दुभाजक नसलेले रस्ते देखील प्रमुख कारण आहे.
दरम्यान, डॉ. मुंडे यांनी भेटीत जिल्ह्यातील रस्ते वाहतूक आणि महामार्ग विषयक चर्चेत अंबाजोगाई दरम्यान असलेल्या वाघाळा ते बर्दापूर फाटा हा जिल्ह्यातून जाणारा मार्ग चौपदरीकरण करण्याचा विषय प्राधान्याने मांडला. या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढल्यामुळे आवश्यक अंतरात रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येईल असा सकारात्मक प्रतिसाद नितीन गडकरी यांनी दिल्याचे डॉ. मुंडे म्हणाल्या. रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना देखील संबंधित विभागाला दिल्या आहेत.
अपघात प्रवण क्षेत्राची गेल्या आठवड्यात डॉ. मुंडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर वाढते अपघात रोखण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. यानुसार आता या रस्त्यावर स्पीड ब्रेकर टाकण्याचे काम देखील सुरु आहे. रस्त्याची समस्या सोडवण्यासाठी आपण पाठपुरावा सुरुच ठेवणार असून लवकरच कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यश येईल हा असा विश्वासही खासदार मुंडे यांनी व्यक्त केला. या मार्गावर प्रवास करताना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
Web Title: Ambajogai Latur Road Develop Demand Pritam Munde Road Transport Minister Nitin Gadkari
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..