जालना जिल्ह्यात मुख्याध्यापकास लाच घेताना पकडले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 December 2020

जीपीएफ फंडातील जमा रक्कम अग्रिम नापरताव्याच्या प्रस्तावावर सही करण्यासाठी बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकाला एक हजार ८० रुपयांची लाच घेताना रविवारी (ता.१३) पकडले आहे.

जालना/बदनापूर : जीपीएफ फंडातील जमा रक्कम अग्रिम नापरताव्याच्या प्रस्तावावर सही करण्यासाठी बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकाला एक हजार ८० रुपयांची लाच घेताना रविवारी (ता.१३) पकडले आहे. बबन दाजीबा झोटे असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे. बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील तक्रारदार सहशिक्षक यांना घराच्या दुरुस्तीचे काम करायचे होते. त्यामुळे त्यांनी आपल्या जीपीएफ फंडातील जमा रक्कम अग्रिम नापरतावा मिळण्यासाठी अर्ज केला. या प्रस्ताव मंजुरीसाठी मुख्याध्यापकांची सही आवश्‍यक होती.

मात्र, शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक बबन दाजीबा झोटे यांनी तक्रारदार सहशिक्षकाकडे एक हजार ८० रुपयांच्या लाचेची मागणी केली. या प्रकरणी तक्रारदार सहशिक्षकाने जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या कार्यालयात रविवारी (ता.१३) पंचासमक्ष एक हजार ८० रुपयांची लाच स्वीकारताना पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संग्राम ताटे, कर्मचारी कृष्णा देठे, शिवाजी जमधडे, गणेश बुजाडे, सचिन राऊत, आरेफ शेख यांनी केली.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anti Corruption Buerau Catch Headmaster For Taking Bribe Jalna News