बॅंकांची मनमानी : कळमनुरीमध्ये पीक कर्ज वाटपात दुजाभाव, शेतकरी संतप्त

संजय कापसे
Friday, 24 July 2020

मागील दोन महिन्यापासून पीक कर्ज मिळविण्यासाठी हेलपाटे घालणाऱ्या शेतकऱ्यांना आता चुकीचे निकष दाखवून पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बॅंकाविरुद्ध शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

कळमनुरी (जिल्हा हिंगोली) : येथील बँक ऑफ महाराष्ट्रकडे दत्तक असलेल्या सांडस येथील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप प्रकरणात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मागील दोन महिन्यापासून पीक कर्ज मिळविण्यासाठी हेलपाटे घालणाऱ्या शेतकऱ्यांना आता चुकीचे निकष दाखवून पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बॅंकाविरुद्ध शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

खरीप हंगामाकरिता पीक कर्ज मिळावे याकरिता बँकेकडून मागविण्यात आलेल्या कागदपत्रांची पूर्तता करताना शेतकऱ्यांची मागील महिन्यापासून दमछाक झाली आहे. बँकांकडून पीक कर्ज वाटपामध्ये अनियमितता होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या मोठ्या तक्रारी आहेत. पीक कर्ज वाटप करताना बँकेकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. पीक कर्जाची संचिका बँकेकडे दाखल केल्यानंतरही या संचिका गुणानुक्रमे निकाली काढण्याऐवजी मर्जीतल्या व दलालामार्फत आलेल्या संचिकांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप शेतकरी वर्ग मधून होत आहे. तालुक्यातील सांडस हे गाव पीक कर्ज घेण्याकरिता बँक ऑफ महाराष्ट्रकडे दत्तक गाव म्हणून देण्यात आले आहे.

मागील दीड महिन्यापासून बँकेत येरझारा सुरू

गावातील शेतकऱ्यांनी पीक कर्ज मिळावे याकरिता मागील दीड महिन्यापासून बँकेत येरझारा सुरू केल्या आहेत. बँक व्यवस्थापनाने ही गावातील जवळपास ७२ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप केले आहे. मात्र अजूनही काही शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले नाही. बँकेकडून या शेतकऱ्यांना बुधवार (ता. २२) पीक कर्ज घेण्यासाठी बोलवण्यात आले.

हेही वाचा -  कपाशीवरील बोंडअळी व सोयाबीनवरील किडीची अशी घ्या काळजी

पालकमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली 

मात्र ऐनवेळी शाखा व्यवस्थापकाने शासनाकडून आलेले निकष दाखवीत ज्या बँकेतून तुमचे पीक कर्ज माफ झाले आहे. त्या बँकेचे मधूनच तुम्हाला     पीक कर्ज उचलावे लागेल अशी भूमिका घेतल्यामुळे शेतकरी वर्गासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. वास्तविक पाहता मागील आठवड्यात पालकमंत्र्यांनी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज योजना लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे अशा शेतकऱ्यांना तातडीने कर्ज वाटप करण्याच्या सूचना   बँकांना दिले आहेत. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी पीक कर्ज संदर्भात आढावा बैठक घेतल्यानंतर लिड बँकेकडून प्रत्येक बँक व्यवस्थापनाला पत्र पाठवून   दत्तक बँकेचा विचार न करता शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत.

बँक प्रशासनाकडून चुकीचे निकष दाखवून निर्णय

त्यानंतरही बँक प्रशासनाकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याकरिता करण्यात येणारी टाळाटाळ पाहता शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे या प्रकाराकडे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. त्यामुळेच शहरातील बँक प्रशासनाकडून चुकीचे निकष दाखवून निर्णय घेतले जात आहेत. या प्रकारात शेतकरी वर्ग भरडला जात असून बँक व्यवस्थापनाच्या या मनमानी कारभाराला आवर घालण्याची मागणी आता शेतकरी वर्गामधून होऊ लागली आहे.

येथे क्लिक करा ...म्हणे एन-95 मास्क हानिकारक ! केंद्राला साक्षात्कार- माजी मंत्री डी. पी. सावंत

प्रशासनाचा अंकुश नसल्यामुळे बँकांकडून मनमानी 

पीक कर्ज वाटप करताना बँक व्यवस्थापनावर प्रशासनाचा अंकुश नसल्यामुळे बँकांकडून मनमानी निर्णय घेत अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. तसेच शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये असल्यामुळे एसबीआय कळमनुरी बँक शाखा शाखा मागील पाच दिवसापासून बंद आहे त्यामुळे शेतकरी बँकेच्या ग्राहक असलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.
- गजानन धांवडकर, शेतकरी.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arbitrariness of banks: Crop loan disbursement in Kalamanuri, farmers angry hingoli news