कृत्रिम पाऊस पाडणारे विमान अद्याप सौदीतच!

डॉ. माधव सावरगावे
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

कृत्रिम पावसाचा पहिला प्रयत्न म्हणून ते नऊ ऑगस्टला चिकलठाणा विमानतळावरून झेपावले. या प्रयत्नात टिपूसभरही पावसाची नोंद झाली नाही.

औरंगाबाद : राज्य शासनाने नऊ ऑगस्टपासून दुष्काळग्रस्त मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग हाती घेतला; मात्र तो प्रयोग नसून "ट्रायल' असल्याचे समोर आले आहे. सोलापूरमध्ये असलेले "इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी'चे (आयआयटीएम) विमान उसनवारीवर आणून ही "ट्रायल' घेण्यात आली. या "ट्रायल'मध्येही पाऊस पडलेला नाही. त्यामुळे तेही विमान माघारी परतले. कृत्रिम पाऊस पाडणारे खरे विमान अद्याप सौदी अरेबियातच आहे. प्रयोगासाठीचे हे विमान 17 ऑगस्टला भारतात दाखल होणार असल्याचे महसूल उपायुक्त सतीश खडके यांनी "सकाळ'ला सांगितले. 

शासनाने 31 कोटी रुपयांची तरतूद करून यंदा राज्यातील अवर्षणग्रस्त भागांत कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी "कॅथी क्‍लायमेट मॉडिफिकेशन कन्सल्टन्स' (केसीएमसी) या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. त्या कंपनीकडे पाठपुरावा केल्यानंतरही कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगासाठी दिरंगाई झाली. अर्धा पावसाळा उलटल्यानंतर मराठवाड्यात अद्याप अपेक्षित पाऊस न झाल्याने कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी जोर धरू लागली.

पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या घोषणा केल्या होत्या. त्यामुळे राज्य सरकारकडून अधिकाऱ्यांच्यावतीने आठ ऑगस्टला पत्रकार परिषद घेऊन कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर सोलापूरहून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीचे (आयआयटीएम) विमान येथे दाखल झाले. कृत्रिम पावसाचा पहिला प्रयत्न म्हणून ते नऊ ऑगस्टला चिकलठाणा विमानतळावरून झेपावले. या प्रयत्नात टिपूसभरही पावसाची नोंद झाली नाही. अनुकूल ढग नसल्याचे कारण सांगण्यात आले. त्याशिवाय ज्या कंपनीला या प्रयोगाचे कंत्राट दिले आहे, त्याच कंपनीचे विमान असल्याचे अधिकाऱ्यांनी त्यावेळी सांगितले. प्रत्यक्षात ते विमान सोलापूरमध्ये उभे केलेल्या "आयआयटीएम'च्या केंद्राचे होते. राज्य सरकारच्या वतीने "आयआयटीएम'ला विनंती करून ते येथे ट्रायलसाठी मागविण्यात आले होते. आता ते सोलापुरात परतले आहे. 

राज्य शासनाने कंत्राट दिलेल्या "केसीएमसी' कंपनीचे विमान सध्या सौदी अरेबियात आहे. 17 ऑगस्टला ते भारतात दाखल होईल. प्रथम ते अहमदाबादला येईल. तिथे "कस्टम'च्या कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विमान औरंगाबादमध्ये दाखल होईल. त्यानंतर कृत्रिम पावसाच्या खऱ्या प्रयोगाला सुरवात होईल, असे सांगण्यात आले. 

विशेष म्हणजे, परवानग्या, कस्टमसंदर्भातील विषय संपले असल्याचे अधिकाऱ्यांनी आठ ऑगस्टच्या येथील पत्रकार परिषदेत सांगितले होते. या सगळ्या खटाटोपानंतर कृत्रिम पावसाची केवळ "ट्रायल'च होती, हे उघड झाले. राज्य शासनाकडून कृत्रिम पावसाची तारीख पाळण्यासाठी ही "ट्रायल' दाखवून दिल्याची चर्चा होत आहे. 

मिशन डायरेक्‍टरची अद्याप नियुक्‍त नाही 

कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगाची घोषणा झाल्यानंतर "मिशन डायरेक्‍टर' म्हणून नंदुरबारचे अपर उपजिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांची नियुक्ती केली होती. प्रयोगाच्या दुसऱ्याच दिवशी बगाटे हे परत नंदुरबारला परतले. "मिशन डायरेक्‍टर' म्हणून त्यांना कुठलेही आदेश अद्याप प्राप्त झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकीकडे "खऱ्या' कृत्रिम पावसाचे विमान नाही आणि संबंधित अधिकारी औरंगाबादेत नसल्याने पाऊस कसा पडेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

 

विमान अमेरिकेहून सौदी अरेबियात दाखल झाले आहे. सध्या विमानातील तांत्रिक त्रुटी दूर करण्यासह तपासणीचे काम सुरू आहे. येत्या शनिवारी (ता.17) विमान भारतात दाखल होईल. अहमदाबादमधील कस्टम विभागाच्या प्रक्रिया पूर्ण करून रविवारी (ता.18) विमान औरंगाबादेत येईल, प्रयोगासाठी सज्ज होईल. 
सतीश खडके, उपायुक्त, महसूल विभाग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Artificial rain plane still in saudi