
Ashadi wari : संत गजानन महाराजांची पालखी आज मराठवाड्यात दाखल
सेनगाव : शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी सोमवारी (ता. पाच) मराठवाड्यात दाखल होणार आहे. पालखीसोबत सातशे वारकरी आहेत. पालखीच्या स्वागतासाठी सेनगाव नगरपंचायतीने जय्यत तयारी केली असून रस्त्यांची डागडुजीही केली आहे.
आषाढी एकादशीनिमित्त शेगाव येथून संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे निघाली आहे. रिसोड मार्गे सेनगाव ते नर्सी नामदेव येथून औंढा नागनाथ असा या पालखीचा
मराठवाड्यातील मार्ग असणार आहे. पालखी आज रिसोड येथे मुक्कामी होती. सोमवारी दुपारच्या सुमारास ती मराठवाड्यात दाखल होणार आहे. त्यानिमित्त सेनगाव तालुक्यातील पानकन्हेरगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद होईल.
त्यानंतर सायंकाळी सेनगाव शहरात पालखीचे आगमन होते. पालखीचा येथे दरवर्षी मुक्काम असतो. त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने वारकऱ्यांच्या जेवणाची व राहण्याची सोय केली जाते. त्याशिवाय तालुकाभरातून येणाऱ्या भाविकांना पालखीच्या
दर्शनासाठी व्यवस्था केली जाते. यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या मैदानासह आजूबाजूचा परिसर चकाचक करण्यात आला आहे.
सेनगावला यात्रेचे स्वरूप
गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन, मुक्कामामुळे सेनगावची बाजारपेठ फुलली आहे. गजानन महाराजांची छायाचित्रे, प्रसाद, मुलांची खेळणे व इतर साहित्याने दुकाने सज्ज झाली आहेत. त्यामुळे सेनगावला जणू यात्रेचेच स्वरूप आले आहे.