आरोपीच्या शोधार्थ गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला; दोन पोलीस कर्मचारी जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police Injured
आरोपीच्या शोधार्थ गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला; दोन पोलीस कर्मचारी जखमी

आरोपीच्या शोधार्थ गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला; दोन पोलीस कर्मचारी जखमी

आष्टी - तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे हद्दीतील पारोडी येथील पारधी वस्तीवर आयोजित एका कार्यक्रमासाठी गुन्ह्यात हवे असलेले काही आरोपी आले असल्याची माहिती अंभोरा पोलिसांना समजताच दोन पोलिस कर्मचारी चौकशीसाठी गेले असता, तेथे असलेल्या उपस्थित जमावाने पोलिसांवरच हल्ला केल्याची घटना गुरुवारी (ता. १९) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसावरच हल्ला झाल्याने आष्टी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, अंभोरा पोलीस ठाणे हद्दीतील पारोडी येथे बुधवारी (ता. १८) सायंकाळी येथील पारधी वस्तीवर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून तेथे विविध गुन्ह्यात हवे असलेले आरोपी येणार असल्याची माहिती अंभोरा पोलिसांना समजताच गुरुवारी (ता. १९) पोलीस नाईक प्रल्हाद देवडे व पोलीस कॉन्स्टेबल शिवदास केदारे हे सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास सदरील वस्तीवर गेले असता त्यांना वस्तीवर मोठ्या प्रमाणावर जमाव आढळून आला.

पोलिसांना पाहताच जमावातील चार ते पाच व्यक्तींनी अचानक पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू करत काठीने मारहाण केली. या मारहाणीमध्ये पोलीस नाईक प्रल्हाद देवडे व कॉन्स्टेबल शिवदास केदारे हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर प्रथम खुंटेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु हाताला व डोक्याला जास्त मार लागल्याने त्यांच्यावर कडा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांवरच जमावाने हल्ला केल्याने आष्टी तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आष्टीचे पोलीस उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर तसेच आंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी अद्याप पर्यंत अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

टॅग्स :policecrimeattackAccused