esakal | संचारबंदीत कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांवर हल्ला; परभणी जिल्ह्यातील घटना 

बोलून बातमी शोधा

file photo

संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर चुडावा (ता. पूर्णा ) चेकपोस्टवर नाकाबंदीसाठी पोलिस नाईक प्रभाकर कच्छवे हे कर्तव्यावर होते

संचारबंदीत कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांवर हल्ला; परभणी जिल्ह्यातील घटना 
sakal_logo
By
जगदीश जोगदंड

पूर्णा (जिल्हा परभणी ) : संचारबंदी बंदोबस्त करत असलेल्या पोलिसांवर करण्यात आलेल्या हल्ल्यात एक पोलिस गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरु आहेत. या प्रकरणी तीन जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर चुडावा (ता. पूर्णा ) चेकपोस्टवर नाकाबंदीसाठी पोलिस नाईक प्रभाकर कच्छवे हे कर्तव्यावर होते. चुडावा पोलिस ठाण्यात हद्दीत शनिवार ( ता. १०) सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी चुडावा पोलिस स्थानकात तीन जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना संक्रमणामुळे राज्यात विकेंड लाॅकडाऊन, संचारबंदी घोषीत करण्यात आली आहे. परभणी जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार चुडावा पोलिसांनी पुर्णा तालुक्यातील चुडावा- नांदेड रोडवर वसमत फाटा येथे शुक्रवारी रात्री पासूनच नाकाबंदी करुन चोख बंदोबस्त तैनात केला होता. चुडावा पोलिस ठाण्याचे कर्मचारी पोलीस निरीक्षक गजानन मैदाने, पोलिस नायक प्रभाकर कच्छवे, पोलिस कर्मचारी धाळेवाड व गृहरक्षक दलाचे आपले कर्तव्य बजावत होते. 

हेही वाचा - नांदेड : ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तु. शं. कुळकर्णी यांचे निधन

यावेळी आरोपीनी संगणमत करुन संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करुन फिर्यादी व साक्षीदारांस शिवीगाळ करुन मारहाण करुन जखमी केले व अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत प्रभाकर कच्छवे यांच्या डोक्यात लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपींना पोलिसांनी घटनास्थळावरुन ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिस प्रभाकर कच्छवे यांनी चुडावा पोलिस स्थानकात संदिप रामराव देसाई, पापा ऊर्फ रामराव देसाई, सचिन रामराव देसाई या तीघांविरोधात तक्रार दिली असून त्यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास फौजदार प्रकाश पंडीत हे करीत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे