बलात्कार प्रकरणातील आरोपीचा पोलिस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न 

पांडूरंग उगले
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

रोपीवर तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता पुढील उपचारासाठी बीडला नेण्याचे सांगितले; परंतु पोलिसांनी त्याला दुपारी तीन वाजता न्यायालयात हजर केले.

माजलगाव : अल्पवयीन विद्यार्थिनीवरील बलात्कार प्रकरणात अटक असलेल्या मनोज फुलवरे या आरोपीने सोमवारी (ता. 20) दुपारी अकरा वाजण्याच्या दरम्यान पोलिस कोठडीत विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आरोपीवर तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता पुढील उपचारासाठी बीडला नेण्याचे सांगितले; परंतु पोलिसांनी त्याला दुपारी तीन वाजता न्यायालयात हजर केले.

शहरातील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवरील बलात्कार प्रकरणात पोलिसांनी रविवारी (ता. 19) तीन आरोपींना अटक केली. यात मुख्य आरोपी आशिष बोरा, मनोज फुलवरे व एका अल्पवयीन युवतीचा समावेश आहे. या आरोपींना रात्रभर शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस कोठडीत ठेऊन दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर करण्यात येणार होते. सोमवारी (ता. 20) सकाळी आकरा वाजण्याच्या दरम्यान यातील आरोपी मनोज फुलवरे याने कोठडीतच विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याने कोठडीतील स्वच्छतागृह साफ करण्याचे लिक्विड पिल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात भरती केले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बीडच्या शासकीय रुग्णालयात नेण्याचे सांगितले. यासाठी डॉक्टरांनी दुपारी एक वाजता रेफर लेटेरही दिले. असे असतानाही पोलिसांनी त्या आरोपीला पुढील उपचारासाठी न नेता दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान न्यायालयात हजर केले. उपचाराऐवजी न्यायालयात हजर करण्याच्या प्रकाराची चर्चा होत आहे.

पोलिस अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा - वर्षभरापूर्वी शहर पोलिस ठाण्यातील पोलिस कोठडीत एका आरोपीने विष पिवून असाच आत्महत्येचा प्रयत्न केला होता; तर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या कोठडीच्या सांधीतून आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पोलिस अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच अशा घटना घडत असल्याच्या प्रतिक्रिया नागरीकातून व्यक्त होत आहेत. 

आरोपीने प्रयत्न केला होता; परंतु एवढा काही गंभीर प्रकार झाला नाही. त्याला आम्ही दुपारी न्यायालयात हजर केले होते.
- बापूसाहेब महाजन, पोलिस निरीक्षक
 

Web Title: Attempt to commit suicide in police custody of accused in rape case