औसा - शहरात भीक मागून पोट भरणाऱ्या एका भिकाऱ्याला शिवी दिल्याच्या रागातून झोपलेल्या अवस्थेत अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. ही घाटना मंगळवारी (ता.४) च्या रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामध्ये हुसेन अहमद पठाण (वय-३७) हा गंभीर जखमी झाला असून त्याला प्रथम औसा येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. नंतर त्याला लातूर येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी औसा पोलिसांनी एकाला अटक केली आहे. "योगेश बुट्टे असे अटक केलेल्या संशयितांचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी (ता.४) रात्री शहरात भीक मागून उपजीविका करणारा हुसेन पठाण हा मुक्तेश्वर रोडवरील लक्ष्मी इलेक्ट्रिक दुकानासमोर झोपला होता. दरम्यान या झोपलेल्या भिकाऱ्याच्या अंगावर बाटलीत भरून आणलेले पेट्रोल ओतून त्याला पेटवून देऊन जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. जाळणारा व्यक्ती अंधारात पळून गेला.
या घटनेत हुसेन पठाण हा भिकारी गंभीर जखमी झाला. याला प्रथम औसा येथील दवाखान्यात दाखल केले पण जखमा गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले. लातूर येथे उपचार सुरू असतांना पीडित हुसेन पठाण याने दिलेल्या फिर्यादी वरून औसा पोलिसांनी जवळचे सीसीटीव्ही फुटेज तपासले.
मात्र संशयितांने तोंडाला रुमाल बांधल्याने पोलिसांना ओळख पटत नव्हती. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, औसा कुमार चौधरी यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे औसाचे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांचे पथकाने गुन्ह्याचा अतिशय बारकाईने तपास करून दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजमधून व गोपनीय माहिती मिळवून भिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळणार्या योगेश सिद्राम बुट्टे (वय-३५) रा. अन्नपूर्णा नगर औसा या संशयित आरोपीला त्याच्या राहत्या घरातून शुक्रवारी (ता.७) रोजी ताब्यात घेतले.
सदर संशयिताला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांच्या तपासात भिकारी हुसेन पठाण याने सांशीत आरोपी योगेश बुट्टे याला शिवी दिल्याच्या रागातून त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेने औसा शहरात एकच खळबळ उडाली आहे. पीडित इसमावर लातूर येथे उपचार सुरू आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे औसा चे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव, सहाय्यक फौजदार कांबळे, पोलीस अंमलदार रतन शेख, समीर शेख, मुबाज सय्यद, बालाजी चव्हाण यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.