गंगाखेडच्या बालाजी मंदिरातील चित्ताकर्षक मूर्तीने वेधले लक्ष  

प्रा. डॉ. अंकुश वाघमारे 
Friday, 23 October 2020

गंगाखेड येथे दरवर्षी नवरात्रानिमित्त शहरातील बालाजी मंदिर संस्थानच्यावतीने दसरा महोत्सव साजरा केला जातो. यंदा कोरोनामुळे हा उत्सव रद्द करण्यात आला. परंतू, नित्यनेमाने मंदिरातील बालाजीच्या मुर्तीची पुजा सुरु आहे. शुक्रवारी बालाजीच्या मुर्तीला पिवळ्या रंगाचा पोशाख चढविण्यात आला होता. त्यामुळे ही मुर्ती अधिकच चित्ताकर्षक दिसत होती. 

गंगाखेड : दक्षिणेतील काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या काठावर तिरुपती बालाजीच्या धर्तीवर साजरा होणारा ऐतिहासिक दसरा महोत्सव सुद्धा शासनाच्या निर्णयामुळे रद्द करण्यात आला. परंतू, मंदिरातील पूजा नित्यनेमाने सुरू आहे. या ठिकाणच्या मूर्तीची दररोजची पूजा ही मनमोही ठरत आहे. 

गंगाखेड येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवास सातशे वर्षांचा इतिहास आहे. परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यातील भक्तगण रथ महोत्सव पाहण्यासाठी अलोट गर्दी करतात. 

हेही वाचा - अर्धापूर पाणी पाणीपुरवठा योजनेच्या कामाने घेतली गती- अशोक चव्हाण यांचे लक्ष

अशी असते दररोजची मिरवणूक 
दसरा महोत्सवाच्या दहा दिवसाच्या काळात श्री बालाजीच्या मूर्तीची पहिल्या दिवशी धजा वाहनातून, दुसऱ्या दिवशी नाग वाहनातून, तिसऱ्या दिवशी मोर वाहनातून, चौथ्या दिवशी वाघ वाहनातून, पाचव्या दिवशी सकाळी सोंड हाल्या हत्ती व सायंकाळी पालखीतून मिरवणूक काढली जाते. सहाव्या दिवशी अंबारी हत्ती वाहनातून, सातव्या दिवशी सकाळी सूर्यवाहन व सायंकाळी चंद्रवाहनातून मिरवणूक काढली जाते. आठव्या दिवशी मारुती वाहनातून, नवव्या दिवशी गरुड वाहनातून व विजयादशमीच्या दिवशी तीस फुटी उंच असलेल्या ऐतिहासिक लाकडी रथातून व सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान अश्व वाहनातून श्री बालाजीच्या मूर्तीची शहरातील शनी मंदिर, डॉ.आंबेडकर नगर, दिलकश चौक, मोठा मारुती, जनाबाई मंदिर आदी भागातून मिरवणूक काढली जाते. 

हेही वाचा - परभणी : वालूर शिवारातील शेतातील बोअरवेलमधून पाण्याचा झरा

व्यवसायिकांमधून नाराजीचा सूर 
हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी मराठवाड्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात गंगाखेड येथे दाखल होतात. परंतू, यावर्षी गंगाखेड शहरातील ऐतिहासिक दसरा महोत्सवास कोरोना महामारीचे ग्रहण लागल्यामुळे शहरातील ऐतिहासिक दसरा महोत्सवास खंड पडला. यामुळे भाविक भक्तांसह याठिकाणी लहान-लहान दुकाने उभा करून पोट भरणाऱ्या व्यवसायिकांमधून नाराजीचा सूर समोर येत आहे. 

‘श्रीं’ना विविध पोशाख परिधान करून सजविण्यात आले
शासनाने मंदिरे खुली न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाविक- भक्त श्रींच्या दर्शनास मुकले आहेत. श्री बालाजीची प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी विधिवत पूजा अर्चना करण्यात आली. ‘श्रीं’ना विविध पोशाख परिधान करून सजविण्यात आले. 
- चंद्रकांत खारकर, पुजारी तथा विश्वस्थ, श्री बालाजी देवस्थान, गंगाखेड. 

 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attractive idol in Balaji temple of Gangakhed, Parbhani News