
Jalna News : निधी खर्च न झाल्यास विभागप्रमुख जबाबदार
जालना : जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मंजूर निधी सर्व विभागांनी वेळेत पूर्ण खर्च करावा. एक पैसाही परत जाता कामा नये. जर निधी अखर्चित राहिल्यास संबंधित विभाग प्रमुखाला जबाबदार धरण्यात येईल, असे निर्देश राज्याचे सहकार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात सोमवारी (ता.२०) जिल्हा वार्षिक जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस खासदार संजय जाधव, आमदार बबनराव लोणीकर, आमदार राजेश टोपे,
आमदार नारायण कुचे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार संतोष दानवे, आमदार राजेश राठोड, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना आदींसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री सावे म्हणाले, की चालू आर्थिक वर्ष संपण्यास कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे ज्या विभागाच्या प्रशासकीय मान्यता बाकी आहे, त्यांनी याच आठवड्यात मान्यतेसाठी प्रस्ताव दाखल करावेत.
यात कुठल्याही प्रकारची दिरंगाई करू नये. या वर्षात जिल्हा वार्षिक योजनाअंतर्गत २८२ कोटी निधी मंजूर आहे. हा संपूर्ण निधी वेळेत खर्च केल्यास पुढील वर्षी कुठलाही कट न लागता जिल्ह्यात पूर्ण निधी मिळेल.
याचबरोबर अनुसूचित जाती उपयोजना आणि ओ.टी.एस.पी.चा निधीही वेळेत खर्च करावेत, असे निर्देश पालकमंत्री श्री. सावे यांनी दिला. तसेच पोकराची प्रलंबित कामे वेळेत मार्गी लावावीत. आमदार संतोष दानवे यांनी मांडलेल्या फळपिक विमाबाबत तक्रारींचे कृषी अधिकाऱ्यांनी तात्काळ निरसन करावे, असे निर्देश पालकमंत्री श्री सावे यांनी दिले.
या बैठकीत मागील बैठकीच्या कार्यवृत्तास व अनुपालन अहवालास मान्यता, चालू वर्षातील खर्चाचा आढावा आणि जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत कामात बदलासंदर्भात यंत्रणेच्या प्रस्तावास मान्यता आदी विषय मांडण्यात आले होते.
अतिक्रमण काढा : गोरंट्याल
दुर्गा माता मंदिर परिसरात पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या आजूबाजूला अतिक्रमण झाले आहे. ते अतिक्रमण तत्काळ काढण्याचे मागणी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली. त्यावर पालकमंत्री श्री. सावे यांनी नगरपालिका प्रशासनाला सात दिवसांत अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले. त्यासाठी आवश्यक पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची सूचना पोलिस अधीक्षकांना दिल्या.
वाळू चोरीवर ही चर्चा
जिल्ह्यात वाळू चोरी आमदार राजेश टोपे यांनी प्रश्न मांडला. यावर पालकमंत्री श्री. सावे यांनी वाळू चोरी ही गंभीर बाब असून शासनाच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वाळू चोरी रोखण्यासाठी महसूल आणि पोलिस विभागाने कडक कारवाई करावी. यात कुठल्याही प्रकारची हयगय करू नये. मुरूम चोरीबाबत आमदार लोणीकर यांनी प्रश्न मांडला.
बोगस टरबूज बियाण्यांसंदर्भात गुन्हे दाखल करा
बोगस टरबूज बियाणांचा प्रश्न आमदार श्री. टोपे यांनी मांडल्यानंतर पालकमंत्री श्री. सावे यांनी बोगस टरबूज बियाणांचा तक्रारीची कृषी अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घ्यावी. केवळ बियाणे विक्रीच्या दुकानावर कारवाई न करता थेट कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी सूचना त्यांनी केली.