शास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर

panashikar
panashikar

लातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे संगीत तुम्हाला मन:शांती देते त्यापासून दूर जाणे योग्य नाही. त्यासाठी शास्त्रीय संगीतातील कलाकारांनीही आपले गाणे खणखणीत ठेवावे आणि श्रोत्यांनी अधिक जाणकार व्हावे, असे स्पष्ट मत जयपूर घराण्याचे गायक पं. रघुनंदन पणशीकर यांनी शनिवारी व्यक्त केले.

ख्याल गायकी, नाटय गीत, भजन, ठुमरी, गझल असे विविध प्रकार अगदी सहजपणे गात संगीताच्या क्षेत्रात आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेले पं. पणशीकर सध्या लातूरमध्ये आले आहेत. यानिमित्ताने ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी त्यांनी पद्म पुरस्कारासाठी होणारी लॉबिंग, ज्येष्ठ कलाकारांच्या सतत होणाऱ्या मैफली या विषयांवर परखड मत व्यक्त केले. शिवाय, शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी श्रोत्यांच्या आणि कलावंतांच्या जबाबदारीकडे त्यांनी लक्ष वेधून घेतले.

पं. पणशीकर म्हणाले, शास्त्रीय संगीताचे महत्वाचे महोत्सव पुणे, मुंबई याच भागात होतात. हे खरे आहे. पण काही महोत्सव आता नाशिक, औरंगाबाद, नागपूर अशा भागात व्हायला लागले आहेत. मात्र त्याचे प्रमाण खूपच कमी आहे. ते वाढवण्यासाठी शास्त्रीय संगीताचा श्रोता वाढवायला हवा. त्याबरोबरच तिकीट काढून संगीत ऐकणे, ही मानसिकताही वाढायला हवी. सुजाण श्रोता वाढविण्यासाठी शाळांमध्ये संगीताचे प्राथमिक शिक्षण द्यायला हवे. पण शाळेतही शास्त्रीय संगीताला स्थान नाही, असेच सध्या दिसत आहे. तरूणांना वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकपेक्षा शास्त्रीय संगीत मन, शरिरासाठी अधिक चांगले आहे, हे पटवून द्यावे लागेल. जसे घरचे जेवणे तब्येसाठी चांगले असते, तसे शास्त्रीय संगीताचे आहे. तो आपला ठेवा आहे. असे विविध पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत.

‘पद्म’साठी लॉबिंग कशाला?
पद्म पुरस्कारांसाठी कलाकारांना लॉबिंग करावी लागते किंवा संबंधीत कलाकार हा आपल्या जवळचा आहे का? आपल्या विचारधारेचा आहे का? हे पाहून पुरस्कार दिले जातात. हे दुर्दैव आहे. ऑल इंडिया रेडिओमध्ये ओळख असल्याशिवाय कलाकाराला ए-ग्रेडचा दर्जा मिळत नाही. ही दोन्ही उदाहरणे सरकारची चांगली व्यवस्था पोखरून कशी गेली आहे, हे दाखवणारी आहे. त्यामुळे सरकारने नुसत्या योजना करून उपयोगाचे नाही. त्याची अंमलबजावणी नीट होणे गरजेचे आहे. त्यासाठी व्यवस्थेत चांगली माणसे येणे आणि त्यांनी चांगल्या माणसांचा स्वत:हून शोध घेणे गरजेचे आहे, असे पं. पणशीकर यांनी सांगितले.

ज्येष्ठांनी नव्यांना संधी द्यावी
ज्येष्ठ गायक, वादकांनी आता थोडे थांबायला हवे. दररोज किंवा वारंवार तुम्ही गायन, वादनाच्या मैफली करत असाल तर संगीताबाबतचा वेगळा विचार कधी करणार, गायन-वादनात वेगळेपणा कधी आणणार, असा सवाल पं. पणशीकर यांनी उपस्थित केला. गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या सर्वांत कमी मैफली झाल्या आहेत. तरी त्यांचे श्रोत्यांवरील गारूड कायम होते. म्हणून ज्येष्ठांनी थोडे बाजूला होऊन नव्या कलावंतांना पुढे आणायला हवे. तरच नव्या पिढीतील गायकांना प्रोत्साहन मिळेल. यांच्यापैकीच कोणीतरी भीमसेन जोशी होईल किंवा जसराजजी होतील. त्यासाठी कलांवंतांच्या पातळीवर आणि श्रोत्यांच्या पातळीवरही मानसिकता बदलणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com