औरंगाबाद शहरावर पुन्हा कचरासंकट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

मारहाण करणाऱ्या नगरसेवकाच्या निषेधार्थ कंपनीचे काम बंद 

औरंगाबाद-शहरात कचरा संकलन व वाहतुकीचे काम करणाऱ्या पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना एमआयएम पक्षाच्या नगरसेवकाने मारहाण केल्याची घटना बुधवारी (ता.13) घडली होती. त्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून, गुरुवारी (ता. 14) शहरातील आठ प्रभागातील कचरा तसाच पडून होता. मारहाण करणाऱ्या नगरसेवकावर गुन्हा दाखल करावा, तसेच महापालिका जोपर्यंत कचरा संकलनासाठी जागा उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा कर्मचाऱ्यांना दिला. 

महापालिकेने शहरातील कचरा संकलनासाठी पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीची नियुक्ती केली आहे. कंपनीचे कर्मचारी गल्लोगल्ली जमा झालेला कचरा काही खुल्या जागांवर एकत्र करून तो मोठ्या वाहनात भरतात. ज्याठिकाणी कचरा भरण्याचे काम सुरू आहे, त्या परिसरातील नागरिक विरोध करत आहेत. त्यातून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी गेल्या आठवड्यात कंपनीची गाडी फोडली होता.

दरम्यान बुधवारी आमखास कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना एमआयएमच्याच नगरसेवकाने मारहाण केली. या छोट्या वाहनातून मोठया वाहनांमध्ये कचरा टाकण्याचे काम सुरू होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास एमआयएमचे स्वीकृत नगरसेवक अबुल हसन हाश्‍मी यांनी परिसरात कचरा पडत असल्याच्या कारणावरून कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला व क्षेत्रीय अधिकारी इरफान व युनूस यांना मारहाण केली. मारहाणीच्या घटनेनंतर दुपारपासून कर्मचाऱ्यांनी कचरा संकलन बंद केले. गुरुवारीही हे आंदोलन सुरूच होते.

सकाळपासून आठही प्रभागातील कचरा संकलन व वाहतुकीचे काम बंद करण्यात आले होते. यामुळे शहरात जागोजागी कचरा ढीग लागले होते. मारहाण करणाऱ्या नगरसेवकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत कर्मचाऱ्यांनी बेगमपूरा पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. तसेच महापालिका मुख्यालयात कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. महापालितर्फे कचरा संकलन व कंपनीची वाहने उभे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला. 

प्रशासनाची बोलणी निष्फळ 
आम्ही खासगी कंपनीचे कर्मचारी असलो तरी काम महापालिकेमार्फत करतो, त्यामुळे प्रशासनाने देखील याप्रकरणी तक्रार द्यावी, अशी कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची मागणी आहे. आंदोलन मिटविण्यासाठी प्रशासनाकडून रेड्डी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बोलणी सुरू होती. मात्र तोडगा निघू शकला नाही. आंदोलन चिघळल्यास शहरावर पुन्हा कचरासंकट ओढवण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad garbage crisis