औरंगाबादमधील शक्कर बावडीने गाठला नाही कधीच तळ, पाहा VIDEO

 औरंगाबाद : हिमायतबागेतील तुडूंब भरलेली इतिहासकालीन शक्‍कर बावडी.
औरंगाबाद : हिमायतबागेतील तुडूंब भरलेली इतिहासकालीन शक्‍कर बावडी.

औरंगाबाद- मुगल बादशाह औरंगजेबच्या काळात उभारण्यात आलेली मोहम्मदी बाग म्हणजेच आजची हिमायत बाग. या बागेला पाणी मिळावे यासाठी त्यावेळी खोदण्यात आलेली शक्‍कर बावडी. या शक्‍कर बावडीतील पाणी हत्ती जुंपलेल्या मोटेने उपसले जायचे आणि या बागेला दिले जायचे. परतीचा पावसाच्या आणि विहिरीत पाझरणारे पाण्याने ही विहीर सध्या तुडुंब भरली आहे. उन्हाळ्यातदेखील कधी तळ न गाठणाऱ्या या विहिरीची सफाई करून पाण्यावर प्रक्रिया केल्यास हिमायत बागेच्या परिसरातील नागरी वसाहतींची उन्हाळ्यातही तहान भागवली जाऊ शकते. 

इतिहासाचे अभ्यासक रफत कुरैशी शक्‍कर बावडीच्या अनुषंगाने संपूर्ण हिमायत बागेचा इतिहास उलगडून दाखवताना म्हणाले, दिल्लीगेटच्या जवळ असलेला तालाब ए खुर्द म्हणजे छोटा तलाव. ज्याला खिजर तालाब म्हणून ओळखला जातो; तर मोठा तलाव म्हणजे आजचा हर्सूल तलाव ज्याचा कान्हेरी लेण्यांमध्ये राजतलाब असा उल्लेख आजही पाहायला मिळतो. दिल्ली गेट परिसरातील खिजर तालाब आज सलीम अली सरोवर नावाने ओळखला जातो.

दिल्लीगेटपासून आमखास मैदानालगत असलेल्या कमल तलावापर्यंत साडेतीनशे एकरामध्ये पसरलेला होता. मोगल, निजाम हे कोणतीही इमारत बांधायची असेल, महाल एक तर सर्वांत उंच जागेवर किंवा तलावाच्या काठावर बांधायचे. शहंशाह औरंगजेब यांनी या खिजर तालावाशेजारी किलेआरक येथे महल उभारला. त्यावेळी या तलावाचे पाणी या महालाच्या भिंतीला आदळत असल्याने महालाच्या भिंतीला ओलावा निर्माण होऊन महालाच्या भिंतीना धोका निर्माण होण्याची वेळ आली होती. त्यामुळे औरंगजेबाच्या काळात आजची मोहम्मदी बाग तयार करण्यात आली आहे. 

मोहम्मदी बागेची झाली हिमायत 

औरंगजेबाच्या काळात ही मोहमदी बाग म्हणून ओळखली जात. या बागेत फसील (तटबंदी), बारादरी, इमारती, झरोखे असलेला समर पॅलेस. या बागेला नहरीचे पाणी वापरले जायचे पण ते पुरेसे नसल्याने विहीर खोदली गेली. तिचे पाणी खूप गोड असल्याने तिला शक्‍कर बावडी नाव पडले. नंतर हैद्राबादच्या 7 व्या निजामाच्या काळात निजामाने त्याचा मोठा मुलगा हिमायतअलीखान याच्या याचे नाव या बागेला दिले. या शक्‍कर बावडीचे पाणी कधीच कमी होत नाही. विहिरीत पाण्याचा पाझर खूप असल्याने ते वाढतच जाते कधीच कमी होत नाही.

यामुळे या विहिरीला छोटया तलावचे स्वरुपच येत असते. उन्हाळयामध्ये या विहिरीची आणखी खोली वाढवली तर आणखी मोठ्या प्रमाणात पाणी साठवण होईल. विहिरीची सफाई करून वॉटर ट्रिटमेंट प्लान्ट बसवला तर परिसरातील खूप मोठया नागरी भागातील नागरिकांची तहान भागवली जाईल असे मत रफत कुरैशी यांनी व्यक्‍त केले. 

आजही करता येऊ शकतो वापर 

डॉ. भगवानराव कापसे (माजी प्रमुख हिमायतबाग, औरंगाबाद) - या विहिरीत पाण्याचा पाझर खूप मोठ्या प्रमाणात आहे. उन्हाळ्यातदेखील पाणी आटत नाही. पूर्वी या विहिरीचे पाणी मोटेने या बागेला दिले जायचे, आठ मोट चालायच्या. त्या मोटांचे थारळे अजूनही आबाधित आहेत. 1972 मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळाच्या काळातही या विहिरीने परिसरातील अनेक वसाहतींची तहान भागवली आहे. 100 बाय 200 आकाराची तर 60 ते 70 फूट खोल ही विहीर आहे.

कृषी विद्यापीठाच्या अधिपत्याखाली ही बाग असून 2004-05 मध्ये या विहिरीतून तीन हजार ट्रॉल्या गाळ काढण्यात आला आहे. या विहिरीच्या पाण्याचा हिमायतबागेतील फळबागा वाढवण्यासाठी आजही खूप चांगल्या प्रकारे उपयोग करून घेता येऊ शकतो. या विहिरीची स्वच्छता करून पाण्यावर ट्रिटमेंट प्लांट बसवला तर परिसरातील अनेक वसाहतींचे या पाण्यावर तहान भागवली जाऊ शकते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com