मराठवाड्याने काँग्रेसला दिला 'हात'; सिल्लोडमध्ये भाजपचा 24-02 असा पराभव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठवाड्याने काँग्रेसला दिला 'हात'; सिल्लोडमध्ये भाजपचा 24-02 असा पराभव

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या सिल्लोड नगरपालिका निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेसने एक हाती सत्ता मिळवली आहे. कॉंग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वावर विश्‍वास दाखवत सिल्लोडकरांनी कॉंग्रेसला गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक यश देत 26 पैकी तब्बल 24 जागांवर विजय मिळवून दिला आहे. यासह कॉंग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार राजश्री राजरत्न निकम विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपच्या अशोक तायडे यांचा 11 हजार मतांनी पराभव केला. 

मराठवाड्याने काँग्रेसला दिला 'हात'; सिल्लोडमध्ये भाजपचा 24-02 असा पराभव

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

औरंगाबाद : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या सिल्लोड नगरपालिका निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेसने एक हाती सत्ता मिळवली आहे. कॉंग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वावर विश्‍वास दाखवत सिल्लोडकरांनी कॉंग्रेसला गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक यश देत 26 पैकी तब्बल 24 जागांवर विजय मिळवून दिला आहे. यासह कॉंग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार राजश्री राजरत्न निकम विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपच्या अशोक तायडे यांचा 11 हजार मतांनी पराभव केला. 

या निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला असून या पक्षाला गेल्यावेळच्या जागा देखील राखता आलेल्या नाहीत. भाजपला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. अब्दुल सत्तार व रावसाहेब दानवे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक होती. यात सत्तार यांनी पुन्हा एकदा दानवेंवर मात केली आहे. सिल्लोड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासह 26 नगरसेवकांसाठी 71.93 टक्के एवढे मतदान झाले होते. नगराध्यक्षपदासाठी 9 तर नगरसेवकपदासाठी 104 उमेदवार रिंगणात होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नगरपालिकेत सत्ता परिवर्तनासाठी जोर लावला होता. मात्र सिल्लोडच्या मतदारांनी अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वालाच पसंती देत मतांचे भरभरून दान कॉंग्रेसच्या पारड्यात टाकले आहे. भाजपला फक्त एका प्रभागात विजय मिळवता आला आहे. 

सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा कॉंग्रेसने दोन जागा जिंकत आपल्या विजयी घोडदौडीला सुरूवात केली. दुपारी साडेबारा वाजता सर्व 13 प्रभागांचे निकाल हाती आले तेव्हा कॉंग्रेसने तब्बल 12 प्रभागात विजय मिळवला. 26 पैकी 24 नगरसेवकांसह नगराध्यक्षपद देखील कॉंग्रेसनेच पटाकावले. त्यामुळे सिल्लोडमध्ये गिरीश महाजन यांची सभा घेऊनही त्याचा भाजपला काहीच फायदा झाला नाही. उलट भाजपचे नगरपालिकेतील संख्याबळ पाचवरून दोनवर आले आहे. 

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, त्यांचे पुत्र समीर सत्तार यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. समीर सत्तार हे मावळते नगराध्यक्ष होते. आगामी विधानसभा निवडणुका पाहता सत्तार यांच्यासाठी नगरपालिकेत पुन्हा सत्ता मिळवणे महत्वाचे होते. निवडणूक जाहीर झाल्यापासून सत्तार यांनी सिल्लोडमध्ये तळ ठोकला होता. प्रभावी प्रचार यंत्रणा राबवल्यामुळे त्याचे भरघोस यश कॉंग्रेसला मिळाल्याचे जाहीर झालेल्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे विकासाला मत द्या असे आवाहन करूनही भाजपला मतदारांनी नाकारले.

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

loading image
go to top