मणक्‍यांचा आजार जडू नये म्हणून घ्या काळजी!

मणक्‍यांचा आजार जडू नये म्हणून घ्या काळजी!

रस्त्यांवरील खड्डे, बदलती जीवनशैली, व्यायामाच्या अभावामुळे वाढताहेत रुग्ण
औरंगाबाद - सतत कामानिमित्त करावा लागणारा प्रवास आणि एकाच ठिकाणी जास्तवेळ बसून, वाकून काम करण्याने मणक्‍यांचे आजार जडण्याचे प्रमाण वाढत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांचा सर्वाधिक त्रास दुचाकीस्वारांना होत आहे. दुचाकीस्वारांत पाठीच्या मणक्‍यांवरील विपरीत परिणामांचे प्रमाण अधिक असल्याची माहिती शहरातील स्पाईन सर्जन डॉ. चंद्रशेखर गायके यांनी ‘सकाळ’ला दिली. 

मणक्‍यांच्या आजाराने त्रस्त असलेले पाचशे ते सातशे रुग्ण दरदिवशी शहरातील डॉक्‍टरांकडे येतात. यामध्ये प्रामुख्याने १८ ते ३५  वयोगटातील तरुणाईचा समावेश आहे. आठ ते दहा वर्षांपासून हा आजार कमी वयातील मुलांमध्येही आढळत आहे. वयोमानाप्रमाणे हाडे ठिसूळ होण्यासारखी व अन्य लक्षणे पन्नाशीच्या पुढच्या रुग्णांमध्ये आढळतात. तर स्थूलतेने येणारे आजार बदलत्या जीवनपद्धतीने विशीतच दिसायला सुरवात झाली आहे. अपघातातील दुखापती, वजनवाढ, मानसिक आणि शारीरिक झीज आदींचे प्रमाण कमी करणे ज्याच्या त्याच्या हाती आहे. त्यासाठी प्रबोधनही तितकेच गरजेचे असल्याचे मत ‘घाटी’च्या फिजिओथेरपी विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना कडू यांनी व्यक्त केले.

पाठीचे व पोटाचे व्यायाम हा सर्वांत उत्तम उपाय आहे. पाठीचा कणा ताठ ठेवून बसणे, बैठी कामे करणाऱ्यांनी खुर्चीतून दर अर्ध्या तासाने उठून चक्कर मारणे अशा छोट्या-छोट्या गोष्टी काळजीपूर्वक केल्या तर फिजिओथेरपी किंवा स्पेन सर्जरीची गरज भासणार नाही, असा सल्ला एमजीएम फिजिओथेरपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सरथ बाबू यांनी दिला. कोणत्याही प्रकारचा मसल पेन असल्यास अगोदर अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञांना दाखवा, त्यांच्या सल्ल्यानुसार आवश्‍यक त्या तपासण्या करा, डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार फिजिओथेरपिस्ट किंवा स्पेन स्पेशालिस्टकडून वेळीच उपचार घेणे गरजेचे असल्याचेही बाबू म्हणाले.

मान व कमरेच्या हाडांमधील अनियमित हालचाली आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे हाडांमधील रचनेची झीज होते. यामध्ये दोन मणक्‍यांतील असणारी गादीची झीज, मणक्‍यात गॅप होणे, मणक्‍यातील गादी सरकणे, हाड सरकणे, मुंग्या येणे, हात-पाय बधिर वाटणे, चक्कर येणे, चालताना त्रास होणे, हाताने वस्तू उचलता न येणे, पायाने लंगडत चालणे आदी लक्षणे किंवा व्याधी दिसू लागतात. त्याला नित्य व्यायामाचा अभाव, बदलती जीवनशैली, समतोल आहाराचा अभाव आदी बाबी कारणीभूत असल्याचे डॉ. गायके म्हणाले.
 

आजाराची ही कारणे...
व्यायामाचा अभाव, काम करताना नीट न बसणे, पुढे वाकून बसण्याची सवय, व्यवस्थित न चालणे, न उठणे, सतत मान वर करून टीव्ही बघणे, मान खाली घालून मोबाईलचा वापर करणे, अधिक काळ वाहन चालविणे, कसेही ओझे उचलणे आदींसह खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी; तसेच संसर्गजन्य आजाराने हाडांवर सूज येणे, मानसिक आणि शारीरिक झीज, संधिवात, आमवात आदींमुळेही मणक्‍याच्या सर्जरी; तसेच फिजिओथेरपीची गरज पडते. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे, हाच उत्तम पर्याय असल्याचे डॉ. कल्पना कडू यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com