आयुक्ताविना कशी चालते महापालिका?

माधव इतबारे
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

  • महापालिकेचा कारभार ठप्पच
  • मंत्रालयही घेईना दखल 
  • न्यायालयात जाण्याची तयारी 

औरंगाबाद : महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या वाढीव सुटीच्या काळात प्रभारी आयुक्त कोण? याचा तिढा शुक्रवारी (ता. 15) पाचव्या दिवशीही कायम होता. महापौर नंदकुमार घोडेले यांनी पुन्हा एकदा मुख्य सचिव अजोय मेहता, नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्याशी फोनवर संपर्क साधला मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. 

Image result for Nipun Vinayak
महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक

महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक दिवाळीपूर्वी म्हणजेच 25 ऑक्‍टोबरपासून सुटीवर आहेत. त्यांनी सुरवातीला दहा दिवसांची सुटी घेतली होती. ही सुटी रविवारी (ता. 10) संपली. त्यामुळे सोमवारी (ता. 11) ते महापालिकेत परत येतील असा अंदाज बांधला जात होता. मात्र आयुक्तांनी पुन्हा आठ दिवसांची सुटी वाढविली. दरम्यान शासनाने महापालिकेचे प्रभारी आयुक्त म्हणून जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची रविवारपर्यंतचे आदेश काढले होते. त्यापुढील आदेश अद्याप त्यांना प्राप्त झालेले नाही. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून महापालिका आयुक्ताविना सुरू आहे. सध्या महापालिकेचा आयुक्त कोण? असा प्रश्न महापौरांनाही पडला आहे.

महापालिकेचा कारभार ठप्प

महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना आयुक्त दीर्घ सुटीवर गेल्यामुळे पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकही त्रस्त आहेत. नियमित आयुक्त सुटीवर असल्याने व प्रभारी आयुक्त महापालिकेकडे फिरकत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून महापालिकेचा कारभार ठप्प आहे. बहुतांश अधिकारी महापालिकेत फिरकतच नाहीत. त्यामुळे डॉ. निपुण यांच्या जागेवर नवीन आयुक्त देण्यात यावा, असे पत्र महापौर श्री. घोडेले यांनी राज्यपालांना पाठविले आहे.

क्लिक करा - बायको छळते? इथे मिळेल आधार...

त्यानंतर त्यांचे राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्याशी तीन दिवसांपासून संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्यापही या अधिकाऱ्यांनी महापौरांना प्रतिसाद दिलेला नाही. शुक्रवारी तिसऱ्या दिवशी दुपारी पुन्हा एकदा महापौरांनी या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र त्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली.

महत्त्वाच्या फाईलकडेच लक्ष 

प्रभारी आयुक्त म्हणून रविवारपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार होता. त्यापुढील आदेश आलेले नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची अडचण झाली आहे. मात्र ते महापालिका अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, तातडीची कामे 
थांबू नयेत, यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे सूत्रांनी सांगितले.

न्यायालयात जाण्याची तयारी 

महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना आयुक्तांअभावी बहुतांश कामे ठप्प आहेत. त्यामुळे नगरसेवकांसह नागरिकांमध्येही नाराजी आहे. नगरसेवक आता आयुक्तांच्या विरोधात उघड-उघड बोलत आहेत. काल स्थायी समितीच्या बैठकीत एमआयएमचे नगरसेवक नासेर सिद्दीकी यांनी आयुक्तांना परत पाठविण्याची मागणी केली होती. तर महापौरांनी आयुक्तांसाठी न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal Corporation Commissioner on Leave