जखमी मोरामुळे वनविभागाची सोयगाव शिवारात झाली धावाधाव

यादवकुमार शिंदे
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

शेतकऱ्यानेच या मोराला पकडून वनविभागाच्या ताब्यात जखमी अवस्थेत स्वाधीन केल्याने, वनविभागाने सुटकेचा निश्वास सोडला.

जरंडी : सोयगाव शिवारातील एका कपाशीच्या शेतात गांगरलेल्या अवस्थेत जखमी मोर आढळल्याने या मोराला ताब्यात घेण्यासाठी बुधवारी वनविभागाच्या पथकाची मोठी धांदल उडाली होती. शेतकऱ्यानेच या मोराला पकडून वनविभागाच्या ताब्यात जखमी अवस्थेत स्वाधीन केल्याने, वनविभागाने सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान धावून दमलेला मोर जखमी झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.

सोयगाव-शेंदुर्णी रस्त्यालगत निसर्गप्रेमी शेतकरी हितेश कुलकर्णी यांचे कपाशीचे शेत आहे. या शेतातील कपाशीच्या शेतात धावून दम लागलेला नर प्रजातीचा मोर गांगरलेल्या अवस्थेत दबा धरून बसलेल्या अवस्थेत हितेश कुलकर्णी यांना आढळून आल्याने त्यांनी तातडीने वनविभागाला घटनेची माहिती दिली. वनविभागाचे वनरक्षक रफिक पठान यांचेसह पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेवून जखमी मोराला पकडून उपचारासाठी सोयगाव च्या पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करून त्याचेवर उपचार केले. त्यानंतर काही कालावधीत त्या जखमी मोराला वनविभागाच्या नर्सरीत मुक्तसंचारासाठी सोडण्यात आले.

श्रावणाच्या हिरवळीवर नाजूक-साजूक वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार-
सोयगाव परिसर श्रावणाच्या हिरवाईने नटला आहे. त्यामुळे या हिरवळीवर बागडण्यासाठी हरीणांचे कळप, मोरांचे थवे मोठ्या प्रमाणावर अजिंठा डोंगररांगांतून या हिरवळीवर आकर्षित होत असल्याने सोयगाव शेतीक्षेत्रात या नाजूक-साजूक प्राण्यांचा मोठा संचार वाढला आहे. परंतु त्या वन्यप्राण्यांचा सुरक्षेचा प्रश्न वाढला आहे.

Web Title: aurangabad news soygaon peacock injured