esakal | Aurangabad : ‘देवांशी’च्या आगमनाला अंथरल्या फुलांच्या पायघड्या!
sakal

बोलून बातमी शोधा

auranagabad

Aurangabad : ‘देवांशी’च्या आगमनाला अंथरल्या फुलांच्या पायघड्या!

sakal_logo
By
सुभाष होळकर

शिवना : एरवी मुलगी जन्माला आली की, नाके मुरडणाऱ्यांची समाजात कमी नाही. मात्र, याच मानसिकतेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे उदाहरण नाटवी (ता. सिल्लोड) येथील कालभिले परिवाराने समाजासमोर ठेवले आहे. आपल्या नातवाला मुलगी झाल्याची बातमी कळताच नाटवी येथील वन समितीचे अध्यक्ष मोतीराम पाटील कालभिले यांच्या परिवाराच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी पेढे वाटून मुलीच्या जन्माचे स्वागत केले. गौरी-गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर आजोळहून ज्यावेळी या ‘महालक्ष्मी’चे आपल्या नाटवी येथील घरी आगमन झाले तेव्हा तिचे ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.

त्यासाठी फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या. त्यानंतर तिच्या पदकमलांना कुंकवामध्ये बुडवून तिच्या चिमुकल्या पावलांचे ठसे पूर्ण घरभर उमटविण्यात आले. शनिवारी (ता. ११) हा सोहळा पार पडला.मोतीराम पाटील यांना चार मुलगे व एक मुलगी, त्यांचे मोठे चिरंजीव विजय यांना दोन मुली व एक मुलगा, संजय यांना दोन मुले, राजेंद्र यांना एक मुलगी व दोन मुले व धाकट्या रवींद्र यांना एक मुलगा, एक मुलगी.

म्हणजे परिवारात मुलामुलींची संख्या जवळपास सारखीच. त्यातच संजय यांचे चिरंजीव उमेश आणि सूनबाई संजीवनी यांच्या संसारवेलीवर २० जुलै २०२१ ला उमललेल्या देवांशी या गोंडस फुलाचे व तिची जन्मदात्री संजीवनी उमेश कालभिले यांचे दिमाखदार स्वागत करून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला. यावेळी बालिकेच्या आजी राधाबाई, बालिकेचे वडील उमेश कालभिले, आत्या सविता जाधव, मामेबहीण डॉ. किरण पालोदकर, अश्विनी जाधव, मामेभाऊ वैभव जाधव, सर्व काका-काकू, पणजी कमलबाई कलभिले आदींसह परिवारातील जवळपास सर्वच लहानथोरांची उपस्थिती होती.

loading image
go to top