धुमशान संपले, आता पदाधिकारी निवडीचे वेध 

योगेश सारंगधर 
बुधवार, 1 मार्च 2017

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे धुमशान आता संपले आहे. नेते, पदाधिकारी, उमेदवार, समर्थक आकडेमोडीत गुंतले आहेत. या संस्थांवरील सत्ताधारी, त्यांचे कॅप्टन कोण असतील, या संदर्भात हालचाली वेगवान झाल्या आहेत... 

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या 62 जागा असून, 2012 मधील निवडणुकीच्या तुलनेत भाजपला तब्बल 16 जागांचा फायदा झाला आहे. हा पक्ष सहावरून थेट 22 जागांवर पोचला आहे. शिवसेनेला 18 जागा असून, गेल्यावेळच्या तुलनेत एक जागा वाढली असली, तरी भाजप मोठा भाऊ होऊन बसला आहे. कॉंग्रेसच्या 16 जागा कायम आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस व मनसेलाच मोठा फटका बसला. दोन्ही पक्षांना 2012 च्या तुलनेत या निवडणुकीत प्रत्येकी सात जागा गमवाव्या लागल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस दहावरून तीन, तर मनसे आठ जागांवरून एक जागेवर घसरली आहे. विशेष म्हणजे बिडकीन येथून निवडून आलेला मनसेचा उमेदवार हा राज्यात एकमेव ठरला आहे. रिपाइंला एक, तर अपक्षाला एक जागा मिळाली आहे. जिल्ह्यातील पंचायत समितीचे निकालही अनपेक्षित लागले. फुलंब्री, खुलताबाद पंचायत समित्यांत भाजपची सत्ता येणार आहे. पैठण, वैजापूरमधील मतदारांनी भाजपऐवजी शिवसेनेला पसंती दिली आहे. गंगापूर पंचायत समितीत सत्तास्थापनेत पेच निर्माण झाला असून, शिवसेना व भाजपला प्रत्येकी नऊ जागा मिळाल्या आहेत. दोन्ही पक्षांना सारख्या जागा मिळाल्याने सत्ता कोणाची येणार, हा औत्सुक्‍याचा विषय आहे. कन्नड येथे रायभान जाधव आघाडीचे प्रमुख आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी जिल्हा परिषद निवडणुकीत पराभूत झाल्या असल्या, तरी पंचायत समितीत सत्तास्थापनेत आघाडीला महत्त्व आले आहे. 16 पैकी पाच जागा आघाडीकडे आहेत. कन्नड तालुक्‍यात पहिल्यांदाच भाजपने जोरदार एंट्री केली आहे. जिल्हा परिषदेच्या तीन, तर पंचायत समितीच्या पाच जागा भाजपने पटकाविल्या आहेत. पैठण, वैजापूरला शिवसेना, औरंगाबाद, सोयगावला कॉंग्रेस, तर सिल्लोड पंचायत समितीत भाजप मोठा पक्ष ठरला आहे. एकंदरीत निवडणुकीचे धुमशान संपले आहे, आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पदाधिकारी निवडीचे वेध लागले आहेत. 

अवयवदानाची चळवळ 
औरंगाबादेत हृदयाची गरज असलेल्या शेतकऱ्याला एक फेब्रुवारीस मेंदूचे कार्य थांबलेल्या शिक्षकाचे हृदय बसविण्यात आले. या शिक्षकाच्या अवयवदानातून चौघांना जिवदान मिळाले. मराठवाड्यात पहिल्यांदाच हृदय प्रत्यारोपणाची प्रक्रिया पार पडली. अशी सुविधा असणारे सिग्मा हॉस्पिटल राज्यातील तिसरे केंद्र ठरले आहे. औरंगाबाद-नगर रस्त्यावरील कायगाव (ता. गंगापूर) येथील साहेबराव डोणगावकर हायस्कूलमधील गणिताचे शिक्षक अनिल पंडित पाटील हे दुचाकी अपघातात जखमी झाले होते. त्यांच्या मेंदूचे कार्य थांबले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. दुसऱ्या एका प्रकरणात मेंदूचे कार्य थांबलेल्या एका सुरक्षा रक्षकाच्या अवयवदानाची नऊ फेब्रुवारीला प्रक्रिया सुरू असतानाच अचानक प्रकृती खलावली. काढलेल्या दोन्ही किडन्या खराब झाल्याने प्रत्यारोपण होऊ शकले नाही. बुलडाणा जिल्ह्यातील या युवकाला दुचाकीवरून जाताना फुलंब्री रस्त्यावर जाताना वाहनाने धडक दिली होती. 

बोगस विम्याचे रॅकेट उद्‌ध्वस्त 
औरंगाबादेत बोगस विमा मिळवून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. बनावट अपघात, खोटी एमएलसी, खोटा पंचनामा करून विमा कंपन्यांच्या सर्व्हेअरकडून सकारात्मक अहवाल घेऊन विम्यासाठी न्यायालयात दावा करून लाखो रुपयांच्या रकमा लुटणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या रॅकेटमध्ये डॉक्‍टर, वकील, विमा सर्व्हेअर, पोलिसासह एजंटांचा समावेश होता. 

दिलासादायक घडामोडी... 
औरंगाबादेत एप्रिलपासून पोसपोर्ट कार्यालय सुरू होणार असून, मुंबईत करावे लागणारे हेलपाटे बंद होतील. यासाठी "सकाळ'च्या "यिन' व्यासपीठाच्या सदस्यांनी सह्यांची मोहीम हाती घेऊन नंतर "यिन'च्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही प्रश्‍न मांडला होता. मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादेत पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यासाठी लक्ष घालण्याचे आश्‍वासन दिले होते. शहरात राष्ट्रीय विधी विद्यापीठाला जूनपासून सुरवात होणार असून, कुलगुरुपदासाठी मुलाखतीही पार पडल्या आहेत. तात्पुरत्या स्वरूपात शासकीय अध्यापक महाविद्यालयात जूनपासून वर्ग सुरू होणार आहेत. घोषणा केल्यानंतर तब्बल सात वर्षांनी अंमलबजावणी होत आहे. शहरातील डॉ. मनीषा वाघमारे या 29 हजार 35 फूट उंचीचे एव्हरेस्ट शिखर सर करण्याची मोहीम चार एप्रिलपासून सुरू करणार असून, 16 मे रोजी एव्हरेस्टवर समारोप होईल. सध्या त्या सराव करीत आहेत. 

औद्योगिक वारे जोरात 
ऑरिकचा (औरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटी) एक भाग असलेल्या बिडकीन औद्योगिक पार्कमधील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी 18 फेब्रुवारीला निविदा निघाली आहे. पहिल्या टप्प्यातील एक हजार सहा हेक्‍टर क्षेत्रावरील पायाभूत विकासकामासाठी दोन वर्षांत तब्बल एक हजार 660 कोटी रुपर्य खर्च होणार आहे. शेंद्रा औद्योगिक पार्कच्या 
839 हेक्‍टरवरील पायाभूत सुविधा उभारणीची कामे हाती घेण्यात आली आहे. आता एकूण तीन हजार 179 हेक्‍टर क्षेत्रावरील बिडकीन औद्योगिक पार्कमधील कामे सुरू होणार आहेत. एन्ड्रेस अँड हाऊझर कंपनीच्या औरंगाबादेतील ऑटोमेशन इन्स्ट्रुमेंटेशन विभागाच्या इमारतीचे विस्तारीकरण नुकतेच झाले. यासाठी कंपनीने 45 कोटींची गुंतवणूक केली आहे. 

Web Title: aurangabad zp