

‘मी मतदान केले, तुम्हीपण करा’ असे मतदारांना आवाहन वासडी येथील १०३ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक रावण नामदेव निकम यांनी बुधवारी (ता.८) केले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची इच्छा असूनही वयोमानामुळे व अपंगत्वाने ते शक्य होत नव्हते म्हणून निवडणूक आयोगाने ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेअंतर्गत ८५ वर्षावरील वृद्ध आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असणाऱ्या मतदारांना घरबसल्या मतदान करता येत आहे. हे मतदान घेण्यासाठी विशेष तीन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ज्या मतदारांनी ‘१२ ड’ अर्जाद्वारे टपाली मतदानाचा पर्याय निवडला आहे, अशा मतदारांच्या घरी जाऊन हे पथक मतदान घेत आहे. या सुविधेमुळे वासडी (ता. कन्नड) येथील वयाची १०३ वर्ष पार केलेले ज्येष्ठ नागरिक रावण नामदेव निकम यांच्या घरातच मतदान केंद्राची रचना केली होती. गुप्त मतदान पद्धतीने त्यांनी मतपत्रिकेवर आपले मत नोंदविले.
मतपत्रिकेची नियमानुसार घडी घालण्यात येऊन ती पाकिटबंद करून सीलबंद करण्यात आली. जे व्हिडिओवर रेकॉर्ड केले जात होते ‘ मी मतदान केले, तुम्हीपण १३ तारखेला मतदान करा’ असे आवाहन १०३ वर्षाचे रावण नामदेव निकम यांनी मतदारांना केले. मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम मतदान केंद्राध्यक्ष विनोद पवार, मतदान अधिकारी मंगेश तायडे, निरीक्षक विलास सोनवणे, पोलिस अधिकारी संतोष गुणावत व्हिडिओग्राफर आण्णासाहेब गायके, बीएलओ अतुल कापुरे, दिनेश निकम यांनी पाहिले.
तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी सांगितले की, कन्नड विधानसभा मतदारसंघात ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग असे ६५ मतदार आहेत. वासडी सर्कलमध्ये सोळा पैकी सोळा मतदान झाले. पहिल्या टप्प्यात ४५ मतदान झाले. हे मतदान निवडणूक आयोगाने निर्देशित केलेल्या निकषांवरच होत आहे. पथकासोबत गुप्त मतदान करण्यासाठी आडोसा, पोलिस कर्मचारी, व्हिडिओग्राफर, केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक, पक्की शाई असा पूर्ण लवाजमा या प्रक्रियेत सहभागी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.