सात महिन्यांच्या उपचारांनंतर
१४ वर्षीय मुलाची जीबीएसवर मात
---
छत्रपती संभाजीनगर, ता. १८ : गुलियन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या मज्जासंस्थेच्या गंभीर आजाराशी सात महिने झुंज देणाऱ्या १४ वर्षीय मुलाने या संकटावर यशस्वी मात केली. चार महिने व्हेंटिलेटरवर उपचार, फुप्फुसांचा संसर्ग आणि रक्तदाबातील चढ-उतार अशा अनेक गुंतागुंतींवर मात करत तो स्वतःच्या पायावर उभा राहून घरी परतला. मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
या मुलाला २८ डिसेंबर २०२५ ला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तत्पूर्वी त्याला जुलाबाचा त्रास झाला होता. त्यानंतर त्याच्या दोन्ही पायांतील ताकद गेली, हातांमध्ये अशक्तपणा आला आणि बोलताना जीभ अडखळू लागली. अवघ्या १२ ते १६ तासांत त्याची श्वसनक्षमता खालावल्याने त्याला तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले.
तपासणीनंतर त्याला जीबीएसचे निदान झाले. उपचारादरम्यान ऑटोनॉमिक डिस्फंक्शनमुळे रक्तदाबात चढ-उतार, एआरडीएस आणि दोन्ही फुफ्फुसांत हवा भरल्याने छातीत नळ्या टाकाव्या लागल्या. दीर्घकाळ कृत्रिम श्वसनाची गरज असल्याने ट्रॅकिओस्टॉमी करून ही ट्यूब सुमारे सहा महिने ठेवावी लागली. बालरोगतज्ज्ञ डॉ. राहुल गोसावी, छाती विकारतज्ज्ञ डॉ. आशिष गाडे, ईएनटी तज्ज्ञ डॉ. शरद शेळके, मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. जयपाल घुणवत, डॉ. अंगद घुले, डॉ. पवन मुंदडा व परिचारिकांच्या समन्वयातून हे यशस्वी उपचार झाले. सांघिक प्रयत्नांमुळेच हे यश मिळाल्याचे हॉस्पिटलचे सेंटर हेड डॉ. विशाल कुटे यांनी सांगितले.