((ग्राउंड रिपोर्ट))
----
NIL26A04128 पर्जन्यमापक यंत्र.
NIL26A04127 हवामान दर्शक यंत्र.
----
अडीच मिलिमीटर पावसाने दुष्काळाचा ‘खंड’ संपतोय!
----
निलंग्यात पिकांचे नुकसान वाढले; विम्याच्या भरपाईबाबत शेतकऱ्यांत संभ्रम
---
राम काळगे
निलंगा, ता. २२ : हवामान विभागाच्या निकषानुसार एखाद्या भागात दिवसाला किमान २.५ मिलिमीटर पाऊस नोंदला, तर तो ‘पावसाचा दिवस’ मानला जातो. त्यामुळे प्रत्यक्षात पिकांसाठी अपुरा पाऊस झालेला असतानाही कागदोपत्री पावसाचा खंड संपल्याचे दिसून येते. परिणामी, शेतीतील दुष्काळसदृश परिस्थिती आणि पिकांची पाण्याची गरज यांचा अचूक अंदाज घेताना हा निकष अडसर ठरत असल्याचे चित्र आहे.
तालुक्यात यंदा खरीप हंगामात दोन टप्प्यांत पेरण्या झाल्या. पहिल्या टप्प्यातील पिके सुरवातीला जोमात होती. मात्र, त्यानंतर पावसाचा मोठा खंड पडल्याने सर्वाधिक क्षेत्र असलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाचा खंड किमान २१ दिवसांचा राहिल्यास व उत्पादनात ठरावीक मर्यादेपेक्षा घट झाल्यास किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाल्यास नुकसानभरपाईची प्रक्रिया सुरू करण्यासाठी ‘ट्रिगर पॉइंट’चा वापर केला जातो. मात्र, या कालावधीत अडीच मिलिमीटर पाऊस नोंदला गेला, तरी खंड तुटल्याचे गृहीत धरले जाते. यंदाच्या खरीप पीकविमा योजनेत ट्रिगर पॉइंटची तरतूद नसल्याने नुकसानभरपाईबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. राज्यात लाखो शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे. प्रतिकूल हवामान, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा अन्य नैसर्गिक संकटांमुळे नुकसान झाल्यास भरपाई निश्चित करताना तंत्रज्ञानाधारित पद्धतीला अधिक महत्त्व दिले जाणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शेतातील नुकसान आणि कागदोपत्री पावसाच्या नोंदी यातील तफावत भरपाईच्या आड येण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
---
पीकविमा मंजुरीबाबत प्रश्नचिन्ह
निलंगा तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात एक लाख सहा हजार ३३२ अर्जदारांनी ६६ हजार ९५८ हेक्टर क्षेत्रावर सात कोटी ६८ लाख शेतकऱ्यांनी रक्कम भरणा केली आहे. म्हणजे ६७ हजार हेक्टरवरील पीकविमा मंजुरीबाबत प्रश्नचिन्ह दिसत आहे.
---
((कोट))
शासनाने ऑनलाइन सुरू केलेल्या रेनफॉल (पर्जन्यमापक) वरती केवळ अडीच मिमी पाऊस पडला, तर त्यामध्ये खंड न धरता तो दिवसाचा पूर्ण पाऊस गृहीत धरला जातो, हे निकष केंद्र सरकारचे आहेत.
सध्याच्या पीक परिस्थितीची वस्तुस्थिती कळविण्यात आली आहे.
- प्रसाद कुलकर्णी, तहसीलदार, निलंगा
----
((कोट))
दिवसाचा पाऊस गृहीत धरण्यासाठी अडीच मिलिमीटरचा निकष चुकीचा आहे. नुकसान होऊनही शासकीय मदत मिळायला मोठा अडसर आहे. पीकविमा मिळण्यासाठी ट्रिगर बंद केले असून, आता उत्पादनावर पीकविमा मिळणार आहे. अनेक वर्षांपासून खरीप पिकाचे उत्पन्न घटल्याने किती पीकविमा अथवा शासनाची नुकसानभरपाई मिळणार याबाबत संभ्रम आहे.
- गोविंदराव पाटील, आदर्श शेतकरी