शहरातील २३ विकासकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

शहरातील २३ विकासकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश
Published on: 
शहरातील २३ विकासकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश --- सर्वसामान्यांच्या घरावर डल्ला मारणाऱ्यांच्या विरोधात म्हाडा आक्रमक --- सकाळ वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर, ता. २० : सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या तब्बल २३ विकासकांच्या विरोधात म्हाडाने कठोर भूमिका घेतली आहे. नियमांचे उल्लंघन करून शासनाची व सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या पाच बांधकाम परवानगीधारक आणि १८ रेखांकन मंजुरी (ले-आऊट) प्राप्त प्रकल्पांच्या विकासकांवर गुन्हे दाखल करावेत, असे पत्र छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्याधिकारी वैभव केदारे यांनी पोलिस आयुक्तांकडे पाठवले आहे. शासनाच्या नियमानुसार, महापालिका क्षेत्रातील चार हजार चौरस मीटरपेक्षा जास्त भूखंड क्षेत्र असलेल्या खासगी भूखंडांचा विकास करताना, त्यातील २० टक्के क्षेत्र हे सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. महापालिकेकडून रेखांकन मंजुरी किंवा बांधकाम परवानगी दिल्यानंतर हे प्रस्ताव म्हाडाकडे पाठवले जातात. नियमानुसार, यातील २० टक्के भूखंड किंवा सदनिका म्हाडाला हस्तांतरित करणे किंवा म्हाडाकडून लाभार्थी निश्चित करणे आवश्यक असते. मात्र, अनेक बांधकाम व्यावसायिक व ले-आऊट धारकांनी या नियमांचे उल्लंघन केल्याची तक्रार रिपाइंचे पुष्पानंद नितनवरे यांनी केली होती. त्यानुसार चौकशीत काही विकासकांनी या तरतुदींची पूर्तता केली नसल्याचे समोर आले. संबंधित विकासकांनी यूडीसीपीआर-२०२० मधील नियम ३.८.२ (ए) व (बी) चे जाणीवपूर्वक उल्लंघन केले आहे. २० टक्के भूखंड किंवा सदनिका म्हाडास हस्तांतरित न केल्यामुळे, शासनाला सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध करून देण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे. --- मुख्य दक्षता विभागाच्या पत्रानंतर कारवाईचा बडगा मुख्य दक्षता व सुरक्षा विभागाच्या २१ ऑगस्ट २०२६ च्या पत्रानंतर म्हाडाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. सर्वसमावेशक गृहनिर्माणच्या तरतुदींचे पालन न करणाऱ्या विकासकांवर फसवणुकीप्रकरणी गुन्हे दाखल करावेत, असे पत्र मुख्याधिकारी वैभव केदारे यांनी ९ ऑक्टोबर रोजी पोलिस आयुक्तांना दिले आहे. त्यामुळे पोलिस याप्रकरणी नेमकी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com