शेतकऱ्यांसाठी महावितरणची २४ तास हेल्पलाइन सुरू
----
रोहित्र जळाल्यास किंवा कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित झाल्यास ८०८७०५२८३० क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन
----
नांदेड, ता. १८ : दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या वीजविषयक तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी महावितरणच्या नांदेड मंडळ कार्यालयाने २४ तास कार्यरत हेल्पलाइन सुरू केली आहे. रोहित्र (डीपी) जळणे, बिघाड होणे किंवा कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित झाल्यास शेतकऱ्यांनी ८०८७०५२८३० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतीसाठी वीजपुरवठा सुरळीत राहणे महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना वीजविषयक समस्यांचा सामना करावा लागू नये आणि त्यांच्या तक्रारींचे तातडीने निवारण व्हावे, या उद्देशाने ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.
हेल्पलाईनवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींची नोंद घेऊन संबंधित महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी समन्वय साधण्यात येणार आहे. तसेच तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आवश्यक पाठपुरावाही केला जाणार आहे. शेतकऱ्यांनी तक्रार नोंदविताना आपले नाव, गाव, तालुका, संपर्क क्रमांक आणि तक्रारीचे स्वरूप स्पष्टपणे सांगावे. त्यामुळे संबंधित यंत्रणेला तातडीने कार्यवाही करणे शक्य होणार आहे. कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा रोहित्रामध्ये बिघाड झाल्यास शेतकऱ्यांनी २४ तास उपलब्ध असलेल्या हेल्पलाईनचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या नांदेड मंडळ कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.