३५ हजार शेतमजूर कुटुंबे मदतीच्या प्रतीक्षेत
-
कामे ठप्प झाल्याने रोजगाराचा प्रश्न; दिवाळीपूर्वी अनुदान देण्याची मागणी
फुलंब्री, ता. १ (बातमीदार) : यंदा पावसाने ओढ दिल्याने फुलंब्री तालुक्यात दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. खरीप पिके वाळून गेल्याने शेतकऱ्यांसोबतच शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतमजुरांच्या उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेतीकामे पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे हाताला काम उरलेले नाही. परिणामी, तालुक्यातील ३५ हजारांहून अधिक शेतमजूर कुटुंबे सध्या उपासमारीच्या छायेत असून शासकीय मदतीची वाट पाहत आहेत.
शासनाकडून शेतकऱ्यांना पीकविमा आणि नुकसानभरपाई दिली जात असली, तरी भूमिहीन शेतमजुरांसाठी कोणतीही स्वतंत्र तरतूद नाही. खुरपणी, फवारणी आणि कापूस वेचणीसारखी कामे बंद असल्याने अनेक कुटुंबांवर उदरनिर्वाहासाठी स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. शासनाने दुष्काळग्रस्त शेतमजुरांचे स्वतंत्र सर्वेक्षण करून त्यांना तातडीने आर्थिक पॅकेज जाहीर करावे, रोहयो अंतर्गत गावातच हक्काचा रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि रेशनद्वारे अतिरिक्त धान्य द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
--
प्रतिक्रिया
शेतकऱ्यांप्रमाणेच आम्हीही शेतीवरच पोट भरतो. दुष्काळात शेतात कामच उरले नसल्याने आमचे कुटुंब संकटात सापडले आहे. सरकारने शेतकऱ्यांप्रमाणेच शेतमजुरांचाही विचार करावा आणि दिवाळीपूर्वी विशेष आर्थिक अनुदान जाहीर करावे.
- गणेश विधाटे,
शेतमजूर, शेलगाव खुर्द