५५० आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले
-
दोन महिन्यांपासून प्रतीक्षा ः सणासुदीच्या काळात अडचण
हिंगोली, ता. १७ : आरोग्य यंत्रणेचा कणा मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एमएचएम) कार्यरत जिल्ह्यातील ५५० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांचे वेतन अद्याप न मिळाल्याने आणि ऑक्टोबर महिन्याचा पंधरवडा उलटूनही वेतनाची प्रतीक्षा कायम असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये हे कर्मचारी अहोरात्र सेवा बजावत आहेत. तुटपुंज्या मानधनावर अत्यावश्यक आरोग्य सेवेचा मोठा भार सांभाळणाऱ्या या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने त्यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. आरोग्य आयुक्तांच्या आदेशानुसार थकीत वेतन तातडीने खात्यावर जमा करावे आणि दरमहा १ तारखेला वेतन देण्याच्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी कंत्राटी कर्मचाऱ्यांमधून केली जात आहे.
चौकट
आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली!
आरोग्य विभागातील नियमित व कंत्राटी कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या १ तारखेला वेतन अदा करून ५ तारखेपर्यंत त्याचा अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश आरोग्य आयुक्त संजय काटकर यांनी जुलैमध्ये दिले होते. मात्र, या आदेशानंतरही हिंगोलीत सलग दोन महिन्यांचे वेतन रखडल्याने प्रशासनाकडून थेट वरिष्ठ पातळीवरील आदेशांनाच केराची टोपली दाखवली जात असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे.
चौकट
नवरात्रोत्सवात कर्मचाऱ्यांची आर्थिक ओढाताण
सध्या नवरात्रोत्सवाचा सण सुरू असून तोंडावर दिवाळी आली आहे. अशा सणासुदीच्या काळात सलग दोन महिने खिसा रिकामा असल्याने कर्मचाऱ्यांना गंभीर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. घरखर्च, घरभाडे आणि बँकेच्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरणे अशक्य झाल्याने दैनंदिन आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच सणाच्या काळात ही वेळ आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.