पान ६ लीड
जिल्ह्यातील ६०५ ग्रामपंचायतींवर प्रशासक
-
निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कारभार; वैजापूरमध्ये सर्वाधिक १०५
कन्नड, ता. १४ (बातमीदार) ः जिल्ह्यातील मुदत संपलेल्या आणि निवडणूक प्रक्रिया अद्याप पूर्ण न झालेल्या ६०५ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी १० सप्टेंबर रोजी याबाबत आदेश काढले. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदींनुसार ही प्रशासकीय व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी व फेब्रुवारी २०२६ मध्ये संपली आहे. मात्र, निवडणूक प्रक्रिया पूर्ण न झाल्याने ग्रामपंचायतींचे दैनंदिन कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. ही नियुक्ती ८ सप्टेंबरपासून सहा महिन्यांसाठी किंवा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन ग्रामपंचायत स्थापन होईपर्यंत, यापैकी जे आधी होईल तोपर्यंत राहणार आहे. प्रशासकांनी ग्रामपंचायतींचा पदभार स्वीकारून दैनंदिन कामकाज सुरळीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती, विविध दाखले तसेच विकासकामांशी संबंधित कामकाजाची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे. आर्थिक व्यवहार करताना महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता २०११मधील नियमांचे पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
चौकट
एका अधिकाऱ्याकडे अनेक गावांचा कारभार
जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचा कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे एका अधिकाऱ्यावर अनेक गावांची जबाबदारी आली आहे. परिणामी प्रत्येक ग्रामपंचायतीला पुरेसा वेळ देणे आणि स्थानिक प्रश्नांवर नियमित देखरेख ठेवणे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.
चौकट
प्रशासकांच्या मानधनाची मागणी
इतर जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारीपासून प्रशासक नियुक्त करण्यात आल्याचे सांगत, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रशासक सरपंचांना फेब्रुवारी ते सप्टेंबर या कालावधीचे पूर्ण मानधन देण्यात यावे, अशी मागणी सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष नारायण जाधव, अंधानेरचे सरपंच अशोकराव दापके यांच्यासह अनेक सरपंचांनी शासनाकडे केली आहे.
चौकट
तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या :
वैजापूर : १०५
सिल्लोड : ८२
कन्नड : ७९
पैठण : ७९
संभाजीनगर : ७७
गंगापूर : ६८
फुलंब्री : ५२
सोयगाव : ३८
खुलताबाद : २४
एकूण : ६०५