रायझिंग मराठवाडा ः अभय हंचनाळ
---------
छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक विकासाच्या सुरवातीच्या काळात अभय हंचनाळ यांच्या कुटुंबाने उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवले. वर्ष १९९५ मध्ये त्यांनी ‘मायक्रॉनिक्स गेजेस प्रायव्हेट लिमिटेड’ची स्थापना केली. आज कंपनी औद्योगिक मोजमाप क्षेत्रात कार्यरत असून, भारतासह परदेशातील अनेक उद्योगांना सेवा देते. तीन उत्पादन युनिट आणि १२५ हून अधिक कर्मचाऱ्यांसह कंपनी कार्यरत असली तरी, हंचनाळ यांच्या मते, उद्योगाची खरी ताकद यंत्रांमध्ये नसून त्या यंत्रांना सक्षमपणे चालवणाऱ्या माणसांमध्ये असते.
--------
‘उद्योगविश्वात बदल हा आता अपवाद नसून नियम झाला. काही वर्षांपूर्वी ज्या तंत्रज्ञानावर उद्योग उभे होते, तेच आज कालबाह्य होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन, रोबोटिक्स, डिजिटल उत्पादन प्रणाली आणि डेटा-आधारित गुणवत्ता नियंत्रण यामुळे उत्पादन क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. अशा परिस्थितीत केवळ उत्पादन करणारे उद्योग नव्हे, तर सातत्याने संशोधन करणारे, नवीन तंत्रज्ञान स्वीकारणारे आणि कौशल्यपूर्ण मनुष्यबळ घडवणारे उद्योगच भविष्यात टिकतील’, असे मत ‘मॅक्रोनिक्स गेजस’चे अभय गिरीश हंचनाळ यांनी व्यक्त केले.
---------
कोणत्याही उत्पादनाची गुणवत्ता त्याच्या अचूक मोजमापावर ठरते. वाहन उद्योग, एरोस्पेस, संरक्षण, औषधनिर्मिती, अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स किंवा वैद्यकीय उपकरणे अशा प्रत्येक क्षेत्रात सूक्ष्म अचूकता आवश्यक झाली. ग्राहक आज केवळ उत्पादन विकत घेत नाही; तर गुणवत्ता, विश्वासार्हता आणि सुरक्षिततेची खात्रीही मागतो. त्यामुळे उत्पादनाइतकेच गुणवत्ता नियंत्रणही महत्त्वाचे झाले. पूर्वी उद्योगांमध्ये नमुन्यांची तपासणी केली जात होती. आता अनेक क्षेत्रांमध्ये प्रत्येक उत्पादनाची तपासणी आवश्यक होत आहे. विशेषतः निर्यात करणाऱ्या उद्योगांसाठी गुणवत्ता ही तडजोडीची बाब राहिलेली नाही. एक छोटी चूकही कोट्यवधी रुपयांचे नुकसान, उत्पादन परत मागविण्याची वेळ किंवा कंपनीच्या विश्वासार्हतेवर परिणाम करू शकते. त्यामुळे आधुनिक उद्योगांमध्ये डेटा, ट्रेसेबिलिटी आणि अचूक मोजमाप यांना मोठे महत्त्व प्राप्त झाले. उद्योगात एकाच उत्पादनावर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. बाजारपेठ, ग्राहकांच्या गरजा आणि तंत्रज्ञान सतत बदलत असते. त्यामुळे संशोधन आणि विकास हा उद्योगाचा कायमस्वरूपी भाग असायला हवा. दर काही वर्षांनी नवीन उत्पादने विकसित करण्याची तयारी ठेवणारे उद्योगच स्पर्धेत टिकतात; अन्यथा स्पर्धक वाढतात, नफा कमी होतो आणि उद्योग मागे पडतो. कोविडनंतर उद्योगविश्वाला मोठा धक्का बसला. इलेक्ट्रिक वाहनांमुळे पारंपरिक वाहन उद्योगाचे स्वरूप बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यातून अनेक उद्योगांनी नवीन दिशा शोधण्यास सुरवात केली.
-------
उद्योग वाढले की रोजगार वाढतो
औद्योगिक विकासासाठी सरकारची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. उद्योगांना अनुदानापेक्षा दर्जेदार पायाभूत सुविधा अधिक आवश्यक असतात. अखंड वीज, पुरेसे पाणी, चांगले रस्ते, सक्षम वाहतूक व्यवस्था आणि उद्योगस्नेही प्रशासन उपलब्ध झाले, तर उद्योजक गुंतवणूक करण्यास तयार असतात. उद्योग वाढले की रोजगार वाढतो, कर महसूल वाढतो आणि शहराचा आर्थिक विकास वेगाने होतो, असे निरीक्षणही हंचनाळ यांनी नोंदवले. उद्योग, शिक्षण संस्था, प्रशासन आणि समाज यांनी एकत्रितपणे कौशल्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण औद्योगिक वातावरण निर्माण करणे ही काळाची गरज आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
------------
संभाजीनगरसाठी पुढील दशक महत्त्वाचे
छत्रपती संभाजीनगरसाठी पुढील दशक महत्त्वाचे आहे. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर (डीएमआयसी), वाढती गुंतवणूक आणि मोठ्या उद्योगांचे आगमन यामुळे शहर राष्ट्रीय औद्योगिक नकाशावर अधिक ठळकपणे उभे राहू शकते. मोठ्या उद्योगांसोबत गुणवत्ता, वेळेचे नियोजन, शिस्त आणि जागतिक कार्यसंस्कृतीही येते. त्याचा फायदा स्थानिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना होतो.
---------
भविष्यात पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ऑटोमेशनमुळे रोजगार कमी होतील, अशी भीती अनेकांना वाटते. मात्र, एआय माणसाची जागा पूर्णपणे घेणार नाही. सतत शिकणाऱ्या आणि स्वतःची कौशल्ये वाढवणाऱ्या व्यक्तींना अधिक संधी उपलब्ध करून देईल. भविष्यात पदवीपेक्षा कौशल्याला अधिक महत्त्व असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी केवळ शिक्षण पूर्ण करण्यावर न थांबता नवीन तंत्रज्ञान, डिजिटल प्रणाली आणि आधुनिक उत्पादन प्रक्रियेचे ज्ञान मिळवणे आवश्यक आहे, असा सल्लाही हंचनाळ यांनी दिला.