Sambhaji Nagar Accident : काळ बनून आलेल्या ‘हायवा’ने घेतला दोन भाऊ, बहिणीचा बळी ; छत्रपती संभाजीनगरातील बाळापूर फाट्याजवळ दुर्घटना

बहिणीचे शासकीय नोकरीचे स्वप्न साकार करण्यासाठी निघालेल्या दोघा भावांसह बहिणीला दोन भरधाव ‘हायवां’मध्ये लागलेल्या ओव्हरटेक करण्याच्या स्पर्धेत एका हायवाने चिरडले. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघे भावंडं ठार झाली.
छत्रपती संभाजीनगरातील बाळापूर फाट्याजवळ दुर्घटना
छत्रपती संभाजीनगरातील बाळापूर फाट्याजवळ दुर्घटनाsakal

छत्रपती संभाजीनगर : बहिणीचे शासकीय नोकरीचे स्वप्न साकार करण्यासाठी निघालेल्या दोघा भावांसह बहिणीला दोन भरधाव ‘हायवां’मध्ये लागलेल्या ओव्हरटेक करण्याच्या स्पर्धेत एका हायवाने चिरडले. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघे भावंडं ठार झाली. ही दुर्दैवी घटना गुरुवारी (ता. ८) सकाळी पावणेदहाच्या सुमारास बीड बायपास रस्त्यावरील बाळापूर फाट्याजवळ घडली. प्रवीण भगवान अंभोरे (२८), प्रदीप ऊर्फ लखन भगवान अंभोरे (२५) आणि प्रतीक्षा भगवान अंभोरे (२२, तिघे रा. अकोली, ता. जिंतूर, जि. परभणी) अशी ठार झालेल्या भावंडांची नावे आहेत.

असा घडला अपघात

या प्रकरणी सातारा पोलिस, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा ही वनरक्षकपदाची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाली होती. गुरुवारी तिची मैदानी चाचणी होती. त्यासाठी ती सातारा परिसरातील राहणाऱ्या भावाकडे आली होती. दोघा भावांसह प्रतीक्षा असे तिघे जण एकाच दुचाकीने (एमएच २१, सीबी ३२२९) सकाळी शेंद्रा येथे गेले होते. सकाळी प्रतीक्षाची मैदानी चाचणी होती. चाचणी पूर्ण करून ते तिघे केंब्रिज चौक, झाल्टा फाटामार्गे घरी जात असताना बाळापूर फाट्याजवळील पाटीलवाडा हॉटेलजवळ त्यांची दुचाकी आली असता, पाठीमागून भरधाव वेगात दोन हायवा आले. एकमेकांना ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या नादात एका हायवाने दुचाकीला पाठीमागून जोरात उडविले. यामुळे तिघेही चिरडले गेले. त्यांना घाटीत दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

छत्रपती संभाजीनगरातील बाळापूर फाट्याजवळ दुर्घटना
Sambhaji Nagar : ‘अग्निशमन’मधील भरतीचा निकाल जाहीर

एकुलती एक प्रतीक्षा हाेती वडिलांची लाडकी

मृत प्रतीक्षाचे वडील भगवान अंभोरे (रा. अकोली, ता. जिंतूर) हे बांधकाम विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत. त्यांना तीन मुले आणि मुलगी प्रतीक्षा अशी चार अपत्ये. मोठा मुलगा अरविंद हा विवाहित असून तो जिंतूर येथे मॅकनिक अाहे. दुसरा मुलगा प्रवीण हा विवाहित आहे, तो शहरातील बायपासच्या शिवछत्रपतीनगर भागात दीड वर्षाच्या मुलासह किरायाच्या खोलीत राहत होता. कापडाच्या दुकानात काम करून तो उदरनिर्वाह भागवत होता. याशिवाय प्रदीप ऊर्फ लखन हा अकाेली गावचा सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य हाेता. प्रतीक्षा िहचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले असून िजंतूर येथील ज्ञानेश्वरी महाविद्यालयात माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण झाले हाेते.

‘हायवा’चालक पसार

ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला जोराची धडक बसताच हायवाचालकाने मागचा-पुढचा विचार न करता हायवा तसाच सोडून पळ काढला. चिकलठाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उशिरापर्यंत पोलिस घटनास्थळ आणि हायवाचालकाची माहिती सीसीटीव्हीच्या माध्यमातून घेत होते.

आई-वडिलांचा घाटीत आक्रोश

अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर तिघांनाही घाटीत दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिघांनाही मृत घोषित केल्यानंतर तिघांचे मृतदेह घाटीतील शवविच्छेदन विभागात नेण्यात आले, तोपर्यंत शहरात राहणाऱ्या नातेवाईकांनी घाटीत धाव घेतली. तर दुपारी अडीचच्या सुमारास प्रतीक्षाचे आई-वडील घाटीत पोचले. एकुलती एक लेक आणि दोन मुले गेल्याच्या दुःखाने नातेवाईक, अंभोरे दांपत्याने घाटीत एकच आक्रोश केला होता.

यशाच्या जवळ गेली; पण काळाने हिरावले

पदवीच्या अंतिम वर्षापासूनच प्रतीक्षाने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. तिने मुंबई पोलिस भरतीही दिली होती. त्या भरतीत ती प्रतीक्षा यादीत (वेटिंग लिस्ट) होती. दरम्यान, वन विभागाच्या वनरक्षकपदाची जाहिरात निघाल्यानंतर तिने शहरात राहून खासगी शिकवणी लावून नेटाने तयारी केली होती. वनरक्षकाच्या लेखी परीक्षेत तिला १२० पैकी ८४ गुण मिळाले होते. मैदानी चाचणीसाठी पात्र ठरल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी झाली. आठ फेब्रुवारीला मैदानी चाचणी असल्याने ती सात फेब्रुवारीलाच भावासह दिवसभर दुचाकीवर प्रवास करून सायंकाळी शहरात राहणाऱ्या मोठ्या भावाच्या खोलीवर आली होती. भल्यापहाटे उठून गावाहून सोबत आलेल्या दुसऱ्या भावासह शेंद्रा येथे मैदानी चाचणीसाठी गेली. तिथेही तिने यशस्वीपणे मैदानी चाचणी दिली. तिला ८० पैकी ५० गुणही मिळाले होते. यशाच्या अगदी जवळ गेलेल्या प्रतीक्षासोबत तिचे शासकीय नोकरीचे स्वप्न साकार करण्यासाठी सोबत आलेल्या भावांवर काळाने घाला घातला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com