‘आदर्श’ची शिक्षण विभागाकडून झाडाझडती
विद्यार्थिनीसोबत झालेल्या छेडछाडीची दखल; विविध नियमांची पडताळणी करून अहवाल तयार होणार
---
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. ६ : शहरातील प्रकाशनगर भागातील ‘आदर्श कॅम्पस’मध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत झालेल्या गैरवर्तनाची व छेडछाडीची दखल घेत शिक्षण विभागाने (माध्यमिक) ‘आदर्श कॅम्पस’ची झाडाझडती सुरू केली आहे. मंगळवारी (ता. सहा) दिवसभर शिक्षण विभागाचे अधिकारी ठाण मांडून बसले होते. त्यामुळे संस्थेवर आता काय कारवाई होणार, याकडे लक्ष लागले आहे.
शाळेच्या आवारात अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडछाड केल्याप्रकरणी आदर्श कॅम्पस या शैक्षणिक संकुलाचा संस्थाचालक व प्राचार्य बशीर शेख याच्याविरोधात रविवारी (ता. चार) एमआयडीसी पोलिस ठाण्यात ‘पोक्सो’सह विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची गंभीर दखल घेत शिक्षण विभागाने संस्थेच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे. शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, गटशिक्षणाधिकारी सी.आर. शेख यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
आदर्श शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना आहेत का, शिक्षकांची उपस्थिती नियमित आहे का, शाळेला मान्यता मिळालेल्या आहेत का, शाळेत सीसीटीव्ही आहेत का, सखी सावित्री समितीची स्थापना झाली आहे का, समित्यांच्या बैठका वेळेवर होतात का, अशा विविध पातळ्यांवर शिक्षण विभागाने पडताळणी सुरू केली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या अहवालाकडे आता लक्ष लागले आहे.