पैठण नगर पालिकेवर येणार प्रशासक? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पैठण नगर पालिकेवर येणार प्रशासक?

पैठण नगर पालिकेवर येणार प्रशासक?

sakal_logo
By
चंद्रकांत तारु

पैठण : नगरपालिकांच्या निवडणुकीबाबत सध्या कोणत्याही हालचाली नसल्यामुळे डिसेंबरला मुदत संपणाऱ्या पालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे पुढील डिसेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या पैठण येथील नगरपालिकेची निवडणूक लांबणीवर पडणार असून तोपर्यंत पालिकांवर प्रशासकाची नियुक्ती होण्याची शक्यता जाणकारांनी वर्तविली आहे.

शासनाकडून नगरसेवकांची संख्या वाढविण्याच्या निर्णयामुळे नव्याने कच्चे आराखडे तयार केले जात आहेत. या आराखड्याची प्रक्रिया, त्यानंतर अंतिम प्रभागरचना यामुळे सर्व प्रशासकीय प्रक्रियेस वेळ लागणार असल्याचे चित्र आहे.पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये पैठण नगर पालिकेची मुदत संपते. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे क्रमप्राप्त होते. पण सध्या निवडणूक आयोगाकडून कोणत्याही हालचाली नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होईल, हे माहीत नाही. मात्र, निवडणूक पूर्व कार्यक्रमासाठी लागणारा कालावधी यामुळे पालिकांवर प्रशासकच येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे एक महिन्याचाच कालावधी पालिका कारभाऱ्यांना मिळणार आहे.

दरम्यान, नगरपालिका निवडणुकीच्या मार्गात अनेक अडचणी आहेत. कोरोनाचा धोका कमी झाला तोच संचारबंदी लागू झाली. यात आणखी काही अडथळे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच प्रभाग रचना, सदस्य संख्येवरून जर कोणी न्यायालयाचे दार ठोठावले तर मग फेब्रुवारी- मार्च २०२२ मध्ये होणारी ही निवडणूक वेळेवर होणार की नाही, यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नगर पालिका निवडणुकीबाबत सर्वच पक्ष संभ्रमात आहेत.

असे असले तरी सर्व राजकीय पक्ष नगरपालिकेवर आमचाच झेंडा फडकणार असे भाकीत करीत आहेत. नगरपालिका निवडणुकीसाठी दोन सदस्यांचा एक प्रभाग राहणार आहे. सदस्य वाढीच्या नव्या निर्णयामुळे आणखी नगरसेवक संख्या वाढीबरोबरच प्रभाग संख्यादेखील वाढणार आहे. संभाव्य गणिते लक्षात घेऊन विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांकडून प्रभागात संपर्क अभियान सुरु आहे.

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांचा हिरमोड

पालिका निवडणुकांचा मुहूर्त पुढे गेल्याने नगरपालिकांच्या निवडणुकीच्या लग्नमंडपात गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. डिसेंबरमध्ये निवडणुका होणार, हे गृहीत धरुन फिल्डिंग लावणाऱ्या इच्छुकांची फिल्डिंग आता विस्कटली आहे. वाढदिवस व पार्ट्यांना आता मर्यादा आल्या आहेत. निवडणुकीचा नूर पालटल्याने राजकीय वातावरण ठंडा ठंडा, कूल कूल असे दिसत आहे.

loading image
go to top