वैद्यकीय शिक्षकांना एईबीएएस पोर्टलवर
एसएमआर अपडेट करणे बंधनकारक
---
छत्रपती संभाजीनगर : फार्मसी शिक्षकांप्रमाणेच आता वैद्यकीय महाविद्यालयांतील सर्व प्राध्यापक, कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टर (जेआर, एसआर), ट्यूटर आणि डेमॉन्स्ट्रेटर यांना त्यांचा राष्ट्रीय वैद्यकीय रजिस्टर (एनएमआर) किंवा राज्य वैद्यकीय रजिस्टर (एसएमआर) क्रमांक ‘आधार आधारित बायोमेट्रिक हजेरी प्रणाली’ (एईबीएएस) पोर्टलवर अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) यासाठी एका महिन्याची मुदत दिली आहे.
एनएमसीच्या सचिवांनी ३ सप्टेंबरला यासंदर्भात परिपत्रक जारी केले. एईबीएएस पोर्टलवर शिक्षकांची सुरवातीला नोंदणी करताना एनएमआर किंवा एसएमआर क्रमांकाचा रकाना रिकामा ठेवण्यात आल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व वैद्यकीय महाविद्यालये व संस्थांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या प्रोफाइलची तपासणी करून हा क्रमांक तत्काळ अपडेट करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
---
बिगरवैद्यकीय शिक्षकांसाठी एनएचा पर्याय
वैद्यकीय शिक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी आपला वैध नोंदणी क्रमांकच पोर्टलवर नमूद करावा, हा रकाना रिकामा ठेवण्यास सक्त मनाई आहे. मात्र, एमएस्सी आणि पीएच.डी. पात्रता असलेल्या बिगरवैद्यकीय शिक्षक, ट्यूटर किंवा डेमॉन्स्ट्रेटर यांच्या नोंदणी क्रमांकाच्या रकान्यात नॉट एप्लीकेबल (एनए) नमूद करावे, असेही स्पष्ट करण्यात आले.
---
मुदतीत अपडेट न केल्यास हजेरी नाकारणार
निर्धारित मुदतीत माहिती अपडेट न केल्यास एनएमसीच्या प्रणालीकडून संबंधित कर्मचाऱ्यांची दैनंदिन बायोमेट्रिक हजेरी ब्लॉक होऊन आपोआप नाकारली जाऊ शकते. याचा थेट परिणाम महाविद्यालयाच्या एनएमसी मूल्यांकनावर व तपासणीतील अनुपालन स्थितीवर होण्याची शक्यता आहे.