LTR26B14897 लातूर : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक दिवसाचे वेतन देणारे कृषी विभागातील कर्मचारी.
---
कृषी कर्मचाऱ्यांचा शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात
----
राज्यभरातून अधिकारी-कर्मचारी देणार साडेचार कोटी रुपयांचा निधी
-----
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. २२ : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृषी विभागातील तांत्रिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. राज्यातील एकूण १४ हजार ४४५ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या वेतनातून सुमारे साडेचार कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणार आहेत. शासनाकडून आवाहन होण्यापूर्वीच स्वेच्छेने हा निर्णय घेतल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल झांबरे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघ आणि त्यांच्याशी संलग्न विविध तांत्रिक अधिकारी, कर्मचारी संघटनांनी या उपक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. लातूर जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी सप्टेंबरच्या वेतनातून एक दिवसाचे वेतन स्वेच्छेने कपात करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी मागणी विभागाला पत्र देऊन करण्यात आली आहे. संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या काळात शेतकऱ्यांसमोर निर्माण होणाऱ्या आर्थिक आणि अन्य अडचणींमध्ये त्यांना मदतीचा हात देण्याच्या सामाजिक भावनेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही नेहमीच शेतकऱ्यांबरोबर राहून त्यांच्या सेवार्थ कामकाज करीत आहोत. कोणी आवाहन करण्यापूर्वीच आम्ही एक पाऊल पुढे जाऊन स्वखुशीने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे साडेचार कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात येणार आहे, अशी माहितीही झांबरे यांनी दिली.