ॲग्रिस्टॅक नोंदणीने गाठला ८३.४८ टक्क्यांचा टप्पा
३ लाख ९८ हजार २४२ शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण, उमरगा तालुका अव्वल
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. १० : शेतकऱ्यांची संपूर्ण आणि अचूक माहिती डिजिटल स्वरूपात एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या ‘ॲग्रिस्टॅक’ नोंदणी अभियानात जिल्ह्याने ८३.४८ टक्क्यांचा टप्पा गाठला आहे. एकूण ४ लाख ७७ हजार ४४ खातेदारांपैकी १० सप्टेंबर २०२६ पर्यंत तब्बल ३ लाख ९८ हजार २४२ शेतकऱ्यांची नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे.
विशेष म्हणजे, ९ सप्टेंबरपर्यंत नोंदणीकृत खातेदारांची संख्या ३ लाख ९८ हजार २०८ इतकी होती. त्यानंतर एका दिवसात ३४ नवीन शेतकऱ्यांची डिजिटल नोंदणी पूर्ण करून प्रशासनाने अभियानातील सातत्य टिकवून ठेवले आहे.
........
तालुकानिहाय कामगिरीत उमरगा अव्वल
जिल्ह्यातील तालुकानिहाय कामगिरीचा आढावा घेतला असता, ८८.४३ टक्के नोंदणी पूर्ण करून उमरगा तालुक्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यापाठोपाठ कळंब आणि वाशी तालुक्यांनीही जोरदार मुसंडी मारली आहे. तुळजापूर तालुक्यात सध्या ७७.८७ टक्के नोंदणी झाली असून, जिल्ह्यात ती सर्वांत कमी नोंदवली गेली आहे.
.......
तालुकानिहाय नोंदणीची टक्केवारी
उमरगा : ८८.४३ (जिल्ह्यात अव्वल)
कळंब : ८७.७८
वाशी : ८६.५३
लोहारा : ८५.५१
परंडा : ८४.१८
भूम : ८२.१६
धाराशिव : ८१.२१
तुळजापूर : ७७.८७
.......
गेल्या २४ तासांत झालेल्या नोंदणीमध्येही उमरगा तालुक्याने बाजी मारली आहे. एका दिवसात उमरग्यात सर्वाधिक १०, परंड्यात ६, लोहारा व तुळजापूरमध्ये प्रत्येकी ५, वाशीत ४, धाराशिवमध्ये २, तर भूम आणि कळंब तालुक्यात प्रत्येकी १ नवीन नोंदणी झाली आहे. कृषी योजनांचा थेट आणि पारदर्शक लाभ मिळण्यासाठी ‘ॲग्रिस्टॅक’ ही डिजिटल नोंदणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जिल्ह्याने ८३ टक्क्यांहून अधिक उद्दिष्ट पूर्ण केले असून, आता उर्वरित १७ टक्के नोंदणी पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.