साहित्य संमेलन : सत्याचा उद्घोष हा लेखकधर्म

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांचे भाषण
Ahil Bharatiya Marathi Sahitya Sammelan
Ahil Bharatiya Marathi Sahitya Sammelansakal

अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी भाषणात साहित्यातील विविध प्रवाहांची चर्चा करण्याबरोबरच सद्य सामाजिक-राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य केले. त्या अनुषंगाने त्यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा संपादित अंश.

आपल्या सर्वांना माहीत आहे की बोटाला धरून ‘काळा’ने आपल्याला हळूहळू वेगवेगळ्या कालखंडातून फिरवून आणलेलं आहे. आपण यंत्रयुग अनुभवलं. त्यानंतर तंत्रयुग अनुभवलं. अणूयुग आणि अवकाशयुग अनुभवलं. आता आपण ‘भ्रमयुगात’ प्रवेश केला आहे. या युगात सर्वसामान्य माणूस भ्रमित झालेला आहे, संमोहित झालेला आहे. मुख्य म्हणजे त्याची वाचा हरवलेली आहे. एक अबोध दहशत, भीती आणि आतंक त्याच्या जगण्याला वेढून, व्यापून राहिलेला आहे. या भीतीबद्दल साहित्याने बोलणं, सांगणं अपेक्षित असतं. म्हणजे, ‘पाहणारा’ आणि ‘पाहणाऱ्यालाही पाहणारा’ अशी ही दुहेरी भूमिका असते.

सध्या सर्वसामान्य माणूस संभ्रमावस्थेत आहे. अगम्य बधिरावस्था त्याला घट्ट लपेटून आहे. परिवर्तन त्याला हवं आहे. शोषणमुक्त समाज त्याला हवा आहे. भ्रष्टाचारातून पिळवटून निघणं त्याला नको आहे. पण आपल्या दुःखाचा परिहार कसा होणार हे मात्र समजलेलं नाही. या सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी कथा अस्तित्वात येणयाची गरज आहे. काही टीकाकारांनी असं दाखवून दिलं आहे की, मराठी साहित्याचं विश्व नेहमीच कर्मठ, स्थितीवादी, आत्मकेंद्री व वास्तवाची दखल न घेणारं असं राहिलं आहे. टीका अशी आहे की, स्वातंत्र्यसंग्रामाबाबत मराठी साहित्यविश्वात विशेष असं काही लिहिलं गेलं नाही. महात्मा गांधींच्या खुनाच्या घटनेचे पडसाद देखील मराठी साहित्यात विशेष उमटलेले नाहीत. मोठ्या अशा समूहाने धर्मांतर करणं, ७२चा दुष्काळ व त्या निमित्ताने शेतकऱ्याचं उद्ध्वस्त होणं या घटनादेखील मराठी साहित्यात आल्या नाहीत.

आजच्या मराठी साहित्याला सर्वसामान्य माणसाच्या जगण्याबाबत काहीएक करूणा वाटते काय, हा जुनाच प्रश्‍न आहे. त्याचं अजूनही नकारार्थी उत्तर द्यावं लागतं. उर्दूमधल्या ‘सादत हसन मंटो’ने अनेक वर्षांपूर्वीच उर्दू कथेला विलक्षण उंचीवर नेऊन उर्दू कथेला मानवी चेहरा दिला. वेश्या, हमाल, डोअरकीपर, टांगेवाले, रस्त्यावर अंगमेहनतीची कामं करून जगणारे, अशांच्या जीवनव्यवहाराबाबत विलक्षण करूणा व आस्था मंटोंच्या कथांमधून प्रकट झाली. मराठी कथेला अद्यापही एखादा मंटो मिळालेला नाही. अद्यापही मराठी कथेमध्ये करूणास्वरूप असं लिखाण आलेलं नसून समाजातला हा दुर्लक्षित वर्ग मराठी कथेतून सहसा सापडत नाही या उणिवेकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

काही विचारवंत दबल्या आवाजात सांगताहेत की, गरीब आणखी गरीब आणि श्रीमंत अतिश्रीमंत होत आहेत. मध्यमवर्ग विभाजित होत असून त्यातील बरेच जण कनिष्ठ मध्यमवर्गात ढकलले जात आहेत. अफगाणिस्तानातील मौलाना रूमी (जन्म १२०७) यांनी पूर्वीच मानवजातीला सावध केलं आहे. ते म्हणतातः

“एक हजार क़ाबिल आदमी के मर जानेसे

इतना नुकसान नही होता जितना, के

एक अहमक के साहिबे एख़तियार होनेसे होता है”

अर्थ असा आहे की लष्करातली एक हजार सक्षम माणसं नष्ट झाली तरी फारसं नुकसान होत नसतं, मात्र एखाद्या विदुषकाच्या अधिकारप्राप्तीनंतर जे नुकसान होतं ते मात्र भरून निघणारं नसतं. ‘अहमक’ म्हणजे विदुषक. सर्कशीत काम करणारा विदुषक इथे अभिप्रेत नाही. विदुषकवृत्तीचा मूढ. ‘साहिबे एख़तियार’ म्हणजे अधिकारप्राप्ती. समाजाने विदुषकप्रवृत्तीच्या मूढांना अधिकारप्राप्ती करून दिली तर समाजाला असह्य पीडा सहन करावी लागते, असा या म्हणण्याचा रोख आहे. पण इतकंच नाही. लेखकाने सत्य बोललं पाहिजे आणि निर्भयतेने बोललं पाहिजे, असंही साहित्य सांगतं. लेखक बुचकळ्यात पडून समाजाकडे पाहतो आहे. समाजात विभाजनवादी निरर्थक, पण अनर्थकारी, उत्तेजना वाढवणारा खेळ मांडला जातोय. आता, त्या पाठोपाठ कुठल्याशा सिनेमाचं समर्थनसुद्धा करण्यात येतं आहे. आता त्यामुळे, सिनेमाही ‘तुमचा’ आणि ‘आमचा’ झाला. जनतेच्या भोळ्या मनाशी चालवलेला हा खेळ लेखक पाहतो आहे. माणसांचं विभाजन होताना पाहतो आहे आणि विद्वेषाचं गणितही मांडलेलं पाहतो आहे. कोणीतरी म्हणतं आहे की, स्वातंत्र्य भिकेत मिळालंय. निर्बुद्ध, दोन कवडीचीही किंमत नसलेल्या लोकांकडून स्वातंत्र्याचा अपमान होतो आहे. काही कथित साधू मुसलमानांचं शिरकाण करायचं म्हणतायत.

लेखक पाहतो की, सरस्वतीचे उपासक दुःखी होतायत आणि लक्ष्मीची उद्धट उपासना चाललीय. अपवाद वगळता सर्वत्र शांतता आहे. सर्वत्र दडे बसवणारी शांतता. कोणीच बोलत नाही. कोणीच हरकत घेत नाही. सर्वत्र ‘चतुर मौन’ पसरलेलं आहे. या मौनात स्वार्थदेखील आहे. तुच्छतादेखील आहे. हिशोब आणि व्यवहारदेखील आहे. सामान्य जनतेच्या दुःखाला चिरडणंदेखील आहे. अशोक बागवे नावाचा कवी ‘मौनाचा निःशब्द कोलाहल’ ऐकतो आहे. तो म्हणतो,

“मौनाचा निःशब्द कोलाहल

नंग्या तलवारी परजत निघून गेलेला

थेट रक्ताच्या पल्याड”

आणि पुढे हा कवी सद्यःपरिस्थितीबद्दल बोलताना लिहितो,

“आकाश ठणकतंय

धरती सुन्न

भरवसा उडून गेलाय

एकमेकांवरचा...”

कालपर्यंत लेखक ऐकत होता. आज लेखक हे सगळे पाहतो आहे. उद्या कदाचित तो बोलेल. त्याने बोललं पाहिजे. तो न बोलला तर प्रमाद होईल. तो न बोलला तर तो ‘चतुर मौनाचा’ बळी ठरेल. लेखक आशावादी आहे. लेखक सत्याग्राही आहे. सत्याचा उच्चार करणं, उच्चरवाने सत्याचा उद्घोष करणं ही लेखकाची भूमिका असते, तो त्याचा धर्म असतो.

अद्भूत रस हद्दपार

मराठी बालसाहित्यातून आपण अद्भुतरस हद्दपार केलेला आहे. सध्याचे बालसाहित्य शुष्क, माहितीपर, गणित आणि विज्ञान यांच्या कोड्यांनी भरलेलं, निरस असं झाल्याचं दिसतं आहे. लांब नाकाच्या चेटकिणी, उडते घोडे, साहसी राजपुत्र, राजकन्या इत्यादींना आपण कुलूपबंद तळघरात ढकलून दिलं. संस्कारवादी बालसाहित्याच्या आग्रही निर्बुद्धतेतून ही घटना घडलेली आहे. विशिष्ट वयात अद्भूतरसाचं सेवन ज्या मुलांना करता येतं ती मुलं बुद्धिमान, प्रतिभावान, तरल कल्पनाशक्तीची देणगी असलेली आणि विकसित व्यक्तिमत्त्वाची बनतात, असं बालमानसशास्त्र सांगत आलेलं आहे. त्याउलट, अद्भुतरसाचा संपर्क ज्या मुलांच्या मनाशी घडला नाही ती मुलं पोटार्थी, शुष्क, अविकसित व्यक्तिमत्त्वाची, अविचारी आणि अरसिक अशी निपजतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com