((अँकर))
((फोटो आहेत.)))
-----
गणरायांच्या मखराला ‘एआय’च्या कल्पकतेचे कोंदण
----
गणपती-महालक्ष्मीच्या सणाला रेडिमेड फुला-हारांनी फुलला बाजार
-----
नारायण भारती
नांदेड, ता. १३ : गणेशोत्सवाच्या उत्साहाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत यंदा शहरातील गणेशभक्तांनी गणरायांच्या मखर सजावटीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) अभिनव वापर केला आहे. पारंपरिक सजावटीसोबत एआयच्या माध्यमातून तयार केलेल्या संकल्पना, आकर्षक प्रकाशयोजना आणि डिजिटल कलाकृतींमुळे मखरांचे रूप अधिकच देखणे झाले आहे.
गणेशमूर्तीची स्थापना करण्यापूर्वीच अनेक मंडळांनी मखराची थीम निश्चित करण्यासाठी ‘एआय’च्या मदतीने विविध कल्पना विकसित केल्या. ऐतिहासिक किल्ले, पर्यावरण संवर्धन, भारतीय संस्कृती, अंतराळ संशोधन तसेच भविष्यातील भारत अशा विविध विषयांवर आधारित मखरांच्या संकल्पना एआयच्या साह्याने तयार करण्यात आल्या. त्यामुळे कमी वेळेत अनेक पर्याय उपलब्ध होत असून, त्यातून मंडळांना आपल्या बजेटनुसार आणि जागेनुसार योग्य संकल्पना निवडता येत आहे. काही मंडळांनी एआयच्या मदतीने तयार केलेल्या दृश्यांवर आधारित एलईडी स्क्रीन, प्रोजेक्शन मॅपिंग आणि डिजिटल ॲनिमेशनचा वापर केला आहे. मखरातील प्रकाश, रंगसंगती आणि सजावटीचे घटक यांचे नियोजनही तंत्रज्ञानाच्या साह्याने केले जात आहे. यामुळे पारंपरिक कलाकुसरीला आधुनिकतेची आकर्षक जोड मिळाली आहे. ‘एआय’मुळे कल्पनांना प्रत्यक्ष रूप देणे सोपे झाले. मात्र, पारंपरिक संस्कृती आणि पर्यावरणपूरक सजावटीला प्राधान्य देत तंत्रज्ञानाचा वापर करीत आहोत, गणरायाच्या भक्तीत आधुनिक तंत्रज्ञानाची भर पडल्याने यंदाचा गणेशोत्सव अधिक सर्जनशील आणि नावीन्यपूर्ण ठरणार असल्याचे चित्र असल्याचे असे गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.
----
रेडिमेड फुला-हारांनी फुलला बाजार
गणपती आणि महालक्ष्मीच्या सणानिमित्त शहरातील बाजारपेठा विविध रंगांच्या फुलांनी आणि आकर्षक रेडिमेड फुला-हारांनी सजल्या आहेत. पारंपरिक फुलांच्या माळांसोबत कृत्रिम फुले, तोरणे, हार, गजरे आणि सजावटीच्या वस्तूंना महिलांकडून मोठी पसंती मिळत आहे. त्यामुळे सणाच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या बाजाराला चांगलीच झळाळी आली आहे.
सणाच्या काळात फुलांचे दर वाढत असल्याने अनेक ग्राहक रेडिमेड फुला-हारांना पसंती देत आहेत. विविध रंग आणि आकर्षक डिझाइनमध्ये उपलब्ध असलेले हे हार टिकाऊ असून, त्यांचा पुन्हा वापरही करता येतो. त्यामुळे घराच्या सजावटीसाठी त्यांना मागणी वाढली आहे. बाजारात झेंडू, गुलाब, मोगरा यांसारख्या नैसर्गिक फुलांच्या माळांसोबतच प्लॅस्टिक, कापड आणि कागदापासून तयार केलेले फुलांचे हार उपलब्ध आहेत. महालक्ष्मीच्या सजावटीसाठी खास तयार केलेले हार, कमानी, तोरणे आणि पडदे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
----
(((कोट)))
दरवर्षी गणेशोत्सवाच्या खरेदीची १५ ते २० दिवसांपूर्वीची लगबग असायची; परंतु, यंदा पुरेशा पावसाअभावी सणावर थोडेसे चिंतेचे सावट असले तरीही उत्साह कायम आहे. दोन दिवसांपासून खरेदीसाठी मोठी लगबग वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठेत चैतन्य असून, दोन दिवसांत मोठी उलाढाल होऊ शकते.
-गौरहरी सामंत, विक्रेता, नांदेड