अजिंठ्यात ''स्टारगेझिंग''ला मुहूर्त कधी?

अजिंठ्यात ''स्टारगेझिंग''ला मुहूर्त कधी?
Published on: 
अजिंठ्यात ‘स्टारगेझिंग’ला मुहूर्त कधी? एमटीडीसीच्या स्थानिक अधिकाऱ्यांची उदासीनता; प्रस्तावावर आठ महिन्यांपासून धूळ प्रताप अवचार छत्रपती संभाजीनगर, ता. १५ : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना रात्रीच्या निरभ्र आकाशातील ग्रहतारे न्याहाळण्याची संधी देणारा ‘स्टारगेझिंग’ (आकाशदर्शन) प्रकल्प अद्याप कागदावरच आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) नोव्हेंबरअखेर अजिंठा व्ह्यूपॉइंट येथे हा उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र, स्थानिक अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे हा प्रकल्प नेमका कधी कार्यान्वित होणार, असा प्रश्न पर्यटनप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. ‘एमटीडीसी’चे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी काही दिवसांपूर्वीच या प्रकल्पाबाबत सकारात्मकता दर्शवली होती. अजिंठा व्ह्यूपॉइंट हा परिसर शहर आणि मानवी वस्तीपासून दूर असल्याने येथे कृत्रिम दिव्यांचा प्रकाश अधिक नसतो. त्यामुळे हिवाळा आणि उन्हाळ्याच्या स्वच्छ वातावरणात सायंकाळनंतर आकाशगंगा, तारकासमूह आणि ग्रहांचे अत्यंत स्पष्ट दर्शन घडते. लेणी पाहून परतणाऱ्या पर्यटकांसाठी हा एक अविस्मरणीय अनुभव ठरेल, असा विश्वास जयस्वाल यांनी व्यक्त केला होता. एकीकडे वरिष्ठ पातळीवर या प्रकल्पासाठी हालचाली सुरू असताना, दुसरीकडे स्थानिक पातळीवर मात्र कमालीची उदासीनता दिसून येत आहे. या प्रकल्पासाठी स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव ‘एमजीएम’च्या खगोल-अंतराळ विज्ञान केंद्राने आठ महिन्यांपूर्वीच दिला आहे. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर पर्यटन विभागाचे उपसंचालक विजय जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ---- स्थानिक तरुणांना प्रशिक्षणाची प्रतीक्षा समुदाय-आधारित पर्यटन संकल्पनेअंतर्गत या प्रकल्पातून स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. या तरुणांना दुर्बीण हाताळण्याचे आणि पर्यटकांना खगोलशास्त्रीय माहिती देण्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले जाणार आहे. ‘एमजीएम’च्या एपीजे अब्दुल कलाम ॲस्ट्रोस्पेस अँड सायन्स सेंटरचे प्रमुख श्रीनिवास औंधकर यांनी काही महिन्यांपूर्वीच एमटीडीसी अधिकाऱ्यांसह व्ह्यूपॉइंटची पाहणी करून पर्यटन विभागाच्या मागणीनुसार प्रस्ताव सादर केला होता. मात्र, तो प्रस्ताव अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. --------- महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी या प्रकल्पासाठी चांगला पुढाकार घेतला आहे; परंतु, स्थानिक एमटीडीसी अधिकाऱ्यांकडून त्यासंदर्भात म्हणावा तसा पाठपुरावा होत नाही. आठ महिन्यांपूर्वीच प्रशिक्षण देण्यासंदर्भात ‘एमजीएम’कडून प्रस्ताव दिला आहे. तसेच दर्जेदार कॅमेरा खरेदीसाठी मार्गदर्शनही केले आहे. तरीही प्रकल्प नेमका कधी सुरू होईल, याची स्पष्टता नाही. काही अधिकाऱ्यांची उदासीनता याला कारणीभूत ठरू शकते. — श्रीनिवास औंधकर, विभागप्रमुख, खगोल-अंतराळ विज्ञान केंद्र, एमजीएम ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.