सल्लागार समितीवर अमर देशमुख नियुक्त
अंबाजोगाई ः सिकंदराबाद विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या सदस्यपदी अमर देशमुख यांची नियुक्ती झाली आहे. दक्षिण मध्य रेल्वेकडून त्यांना नोव्हेंबर २०२६ ते ऑगस्ट २०२८ या कालावधीसाठी नियुक्तीपत्र प्राप्त झाले आहे. खासदार बजरंग सोनवणे यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष असलेल्या देशमुख यांची ही निवड झाली. याबद्दल माजी आमदार पृथ्वीराज साठे, राजेसाहेब देशमुख, संजय भोसले, ॲड. इस्माईल गवळी, मदन परदेशी, अंकुश हेडे, व्यंकटेश चामणर व भगवान ढगे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
----
माजलगाव ः येथील सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्य लिपिक संतोष मधुकर लवडकर यांचा विद्यालयात सेवानिवृत्तीबद्दल कुटुंबासह सत्कार करण्यात आला. (छायाचित्र - MAJ26A06528)
संतोष यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव
माजलगाव ः येथील सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्य लिपिक संतोष मधुकर लवडकर हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सेवा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी ॲड. विश्वास जोशी होते. व्यासपीठावर अमरनाथ खुर्पे, प्रकाश दुगड, नितीन चौधरी, प्रशांत भानप, मुख्याध्यापक संतोष लिंबकर आणि लवडकर दाम्पत्य उपस्थित होते. संस्थेतर्फे आहेर, तर विद्यालयातर्फे चांदीचे करंडे, शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार झाला. मुख्याध्यापक लिंबकर यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. सूत्रसंचालन रोहित खिंडरे यांनी केले, तर आभार रवींद्र खोडवे यांनी मानले.
-----
राष्ट्रसेविका समितीचा विजयादशमी उत्सव संपन्न
बीड ः समाजात बंधुभाव आणि संस्कृती संवर्धनासाठी राष्ट्रसेविका समिती ९० वर्षांपासून कार्यरत असल्याचे प्रतिपादन प्रांत कार्यकर्त्या सुरेखताई दराडे यांनी केले. बीडच्या जवाहर कॉलनीत आयोजित विजयादशमी उत्सवात त्या बोलत होत्या. याप्रसंगी डॉ. सारिकाताई क्षीरसागर यांनी समितीच्या कार्याचा गौरव केला. प्रास्ताविक डॉ. सीमाताई जोशी यांनी केले. मंचावर रत्नाताई हासेगावकर, उज्ज्वलाताई मसलेकर, जयश्रीताई नेलवाडकर उपस्थित होत्या. उत्सवादरम्यान घोष पथसंचलन आणि शस्त्रपूजन झाले. अहिल्यादेवी होळकर जयंती व वंदे मातरम महोत्सवानिमित्त समितीच्या उपक्रमांची माहिती या वेळी देण्यात आली.
-----
ऑनलाइन चक्री जुगारावर पोलिसांचा छापा
बीड ः शहरातील नवीन भाजी मंडई परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या अवैध ऑनलाइन चक्री जुगारावर शहर पोलिसांनी अचानक छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दीपक लक्ष्मण कदम (रा. स्नेहनगर, बीड) याचे नाव समोर आले आहे.
------
पसायदान पोदार लर्न स्कूलमध्ये राष्ट्रीय एकता दिन उत्साहात
माजलगाव ः सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पसायदान पोदार लर्न स्कूलमध्ये राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी विविधतेतून एकता आणि राष्ट्रीय एकात्मता दर्शवणारे आकर्षक नृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गौरी दीक्षित होत्या. विद्यार्थ्यांना नृत्यासाठी श्रीमती शिंगाडे यांनी मार्गदर्शन केले, तर कलाशिक्षक कृष्णा गायकवाड यांनी सरदार पटेल यांचे सुंदर चित्र रेखाटले. देशप्रेम आणि बंधुभाव वृद्धिंगत करणाऱ्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.