ABD26J79264, ABD26J79263
गुलमंडी ः शहरातील एका दुकानात विक्रीसाठी दाखल झालेले ‘अमरावती पॅटर्न’चे मुखवटे. (दुसऱ्या छायाचित्रात) मुखवट्यांना न्याहाळताना महिला ग्राहक.
अमरावती पॅटर्न ठरतोय लक्षवेधी
-
बाजारपेठेत गौराईंच्या मनमोहक मुखवट्यांना मोठी मागणी
राहुल जोशी
छत्रपती संभाजीनगर, ता. १३ : नेहमीप्रमाणे यंदाही बाजारपेठेत गौराईंसह पिलवंडांचे सुंदर मुखवटे दाखल झाले आहेत. त्यांच्या किमती साधारण १५०० ते १२ हजार रुपयांपर्यंत आहेत. महालक्ष्मीच्या मुखवट्यांमध्ये सध्या स्थानिक कारागिरीसोबतच ‘अमरावती पॅटर्न’ला ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. पूर्वी ‘पेन पॅटर्न’ची मोठी मागणी होती. मात्र, गेल्या सात-आठ वर्षांत ‘अमरावती’ने बाजारपेठ काबीज केली आहे.
यंदा गुरुवारी (ता. १७) गौरी आवाहन आहे. या लाडक्या लेकींच्या स्वागतासाठी आणि सजावटीसाठी सध्या शहरातील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. नटवण्यासाठी लागणारे कपडेही स्थानिक पातळीवर अत्यंत कलाकुसरीने तयार केले जात आहेत. खण, मखमली व्हेलवेट आणि अस्सल पैठणीच्या कापडापासून बनवलेले पोशाख लक्ष वेधून घेत आहेत. या कपड्यांची किंमत साधारण चारशे रुपयांपासून सुरू होत आहे. तसेच ठुशी, मोहनमाळ, बोरमाळ, लक्ष्मीहार, चपलाहार, मोत्यांच्या माळा, राणीहार, नथ, कानातले, बाजूबंद, बांगड्या, कमरपट्टा, मंगळसूत्र, बिच्छवे आणि मुकुट अशा आदी पारंपरिक आभूषणांनी बाजारपेठ सजली आहे. यातही मोती आणि डायमंड लूकच्या दागिन्यांची मोठी क्रेझ आहे.
चौकट
चेहऱ्याची ठेवण, डोळ्यांचे जिवंत भाव
मुखवट्यांची वैशिष्ट्ये सांगताना व्यावसायिक गणेश तांदळे म्हणाले, की स्थानिक आणि अमरावती पॅटर्न दोन्ही ‘पीओपी’पासूनच बनवले जातात; मात्र ‘अमरावती पॅटर्न’मधील चेहऱ्याची ठेवण, डोळ्यांचे जिवंत भाव, रंगसंगती आणि रेखीव फिनिशिंग अधिक उठावदार असते. हे मुखवटे पाहताच साक्षात गौराई समोर उभी असल्याचा भास होतो. यात गालावर खळी असणाऱ्या गौराईंचे मुखवटे आणि साधे मुखवटे असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. याच जिवंतपणामुळे ग्राहक या मुखवट्यांना विशेष पसंती देत आहेत.
चौकट
हलक्या फायबर बॉडीला पसंती
गौराईच्या सजावटीसाठी आता नवीन पॅटर्नचे रेडिमेड कोथळे (सांगाडे) उपलब्ध आहेत. यामध्ये केवळ साडी नेसवण्याची आवश्यकता असते. साधारण पंधराशे रुपयांपासून सुरू होणारे स्टीलचे कोथळेही बाजारात आहेत. महालक्ष्मीचा सांगाडा (बॉडी) तयार करण्यासाठी पूर्वी ‘पीयू’ मटेरियल वापरले जायचे; पण आता हाताळण्यास अतिशय सोप्या आणि हलक्या असलेल्या ‘फायबर बॉडी’ला अधिक पसंती दिली जात आहे. याची किंमत १० हजारांच्या पुढे आहे. सजावटीला मऊपणा आणण्यासाठी कापूस आणि रुईच्या मिश्रणाचाही वापर होत आहे.
---------
प्रतिक्रिया
महालक्ष्मीचे मुखवटे अत्यंत श्रद्धेने वर्षानुवर्षे जपून ठेवले जातात. त्यामुळे दरवर्षी नवीन मुखवटे खरेदी करणारा वर्ग मर्यादित असतो. बहुतांश वेळा घरात नवीन लग्न झालेले असल्यास किंवा जुने मुखवटे खंडित झाल्यास नवीन खरेदी केली जाते.
- गणेश तांदळे,
व्यावसायिक, गुलमंडी