पोषण ट्रॅकर अन् प्रत्यक्ष स्थितीची होणार पडताळणी
जिल्ह्यातील अंगणवाड्यांची तपासणी; १५ नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश
छत्रपती संभाजीनगर, ता. १ : शाळांप्रमाणेच आता जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील सुविधांची डिजिटल नोंद आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये तफावत आहे का?, याची तपासणी होणार आहे. राज्याच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या (आयसीडीएस) आयुक्तांनी राज्यातील सर्व अंगणवाड्यांची प्रत्यक्ष पाहणी करून पोषण ट्रॅकरवरील माहितीची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता जिल्ह्यातील ३,४२२ अंगणवाड्यांची पडताळणी केली जाणार आहे.
या मोहिमेचा अंतिम अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याची मुदत निश्चित केली आहे. तथापि, पोषण ट्रॅकरच्या डिजिटल डॅशबोर्डवर अंगणवाड्यांमधील सुविधा, लाभार्थींची संख्या आणि विविध सेवांची माहिती नोंदविली जाते. मात्र, डिजिटल नोंदींमध्ये सर्व सुविधा उपलब्ध असल्याचे दिसत असले, तरी प्रत्यक्षात काही केंद्रांमध्ये मूलभूत सुविधांच्या अभावाच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. त्यामुळे ऑनलाइन नोंदी आणि जमिनीवरील वास्तव यांची पडताळणी या मोहिमेतून केली जात आहे. त्यानुसार बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षिकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अंगणवाड्यांना प्रत्यक्ष भेटी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. २० ऑक्टोबरपासून ही मोहीम सुरू झाली असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही तपासणी पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात आले.
----
पोषण आहारासह सुविधांपर्यंत तपासणी
या मोहिमेत बालके, गरोदर आणि स्तनदा मातांना दिला जाणारा पूरक पोषण आहार, बालकांची उपस्थिती, गृहभेटी, पूर्वप्राथमिक शिक्षण, आरोग्यविषयक सेवा यांची तपासणी केली जाणार आहे. तसेच पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, स्वच्छता आणि इतर पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष स्थितीही तपासली जाईल.
----
जिल्हा स्तरावरील अहवालाला महत्त्व
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १४ ग्रामीण प्रकल्पांतर्गत ३ हजार ४२२ अंगणवाड्या कार्यरत आहेत. या सर्व केंद्रांमधील डिजिटल नोंदी आणि प्रत्यक्ष सुविधांची पडताळणी होणे अपेक्षित आहे. जिल्हा स्तरावर संकलित केलेला अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत आयुक्त कार्यालयाकडे पाठवावा लागेल. या तपासणीतून अंगणवाड्यांमधील सुविधांची वास्तविक स्थिती, त्रुटी आणि सुधारणांची आवश्यकता स्पष्ट होईल.
----
तालुकानिहाय अंगणवाड्या
छत्रपती संभाजीनगर ७४७, गंगापूर ४४८, कन्नड ५२९, खुलताबाद १९३, पैठण ४६२, फुलंब्री २०४, सिल्लोड ४८३, सोयगाव १५०, वैजापूर ३०९