आष्टीत अंगणवाडीच्या ४९ पदांसाठी भरती
----
सेविकेची चार, मदतनिसांची ४५ पदे रिक्त; ११ सप्टेंबरपर्यंत अर्जाची मुदत
-----
आष्टी, ता. २ (बातमीदार) : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प (ग्रामीण), आष्टीअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनिसांची एकूण ४९ पदे भरण्यासाठी भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यात अंगणवाडी सेविकेची चार, तर मदतनिसांची ४५ पदे आहेत. पात्र महिला उमेदवारांकडून ३१ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत अर्ज मागविण्यात आले आहेत.
अंगणवाडी सेविका पदासाठी दौलावडगाव खलाटवाडी, कापसी आणि बीडसांगवी येथे प्रत्येकी एक पद रिक्त आहे. तर मदतनीस पदासाठी पांढरी, हरिनारायण आष्टा, चिंचेवाडी, दौलावडगाव, सावरगाव घाट, देऊळगाव घाट, खडकवाडी, वनवेवाडी, पांगरा, पाटसरा, धानोरा, टाकळी अमिया, साबलखेड, डोंगरगण, गणगेवाडी, शेकापूर, कापसी, बेलगाव, कडा, देवीनिमगाव, खिळद, मांडवा, सुंबेवाडी, पुंडी, साकत, पारोडी, निमगाव बोडखा, घोंगडेवाडी, कोकरेवाडी, महादेववाडी, अंभोरा, घाटापिंपरी, मंगरूळ, जामगाव, दैठणा, धामणगाव, महाजनवाडी, पाटण सांगवी, किन्ही आणि बीडसांगवी येथील अंगणवाडी केंद्रांचा समावेश आहे. काही गावांमध्ये एकापेक्षा अधिक केंद्रांवर मदतनिसांची पदे रिक्त आहेत.
सेविका व मदतनीस पदासाठी उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पदवी, पदव्युत्तर, डी.एड., बी.एड., एमएससीआयटी किंवा समकक्ष उच्च शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना नियमानुसार गुणांचा लाभ मिळणार आहे. संबंधित गावातील स्थानिक रहिवासी महिला उमेदवार असणे ही महत्त्वाची अट असून, सक्षम प्राधिकाऱ्याचा रहिवासी असल्याचा पुरावा अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
अर्जाच्या अंतिम दिनांकास उमेदवाराचे वय किमान १८ व कमाल ३५ वर्षे असावे. विधवा उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे आहे. अर्जासोबत जन्मतारखेचा पुरावा, शैक्षणिक प्रमाणपत्रे, रहिवासी प्रमाणपत्र, लागू असल्यास जात प्रमाणपत्र तसेच विधवा व अनुभवासंबंधी आवश्यक कागदपत्रे जोडावी लागणार आहेत.
-----
२८ सप्टेंबरला यादी
भरतीप्रक्रियेनुसार २८ सप्टेंबरला प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवर २८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबरदरम्यान हरकती व आक्षेप नोंदविता येतील. प्राप्त आक्षेपांची छाननी केल्यानंतर १२ ऑक्टोबरला गुणवत्ता यादीत सुधारणा करण्यात येणार असून, अंतिम निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाणार आहे. अर्ज एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प (ग्रामीण), आष्टी येथे सादर करावेत.