फैज कॅम्पसमध्ये सिरत-ए-नबी जलसा उत्साहात
परभणी ः फैज कॅम्पसमध्ये वार्षिक सिरत-ए-नबी कार्यक्रमात उपस्थित मान्यवर.
परभणी, ता. १४ : शहरातील रहमतनगर येथील फैज कॅम्पसमध्ये वार्षिक जलसा-ए-सिरत-ए-नबी उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. नांदेड येथील हजरत अल्लामा मौलाना मुफ्ती खलीलुर रहेमान यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
पाच दिवस चाललेल्या या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भाषण, नात, सिरत क्विझ, अजान तसेच लेखी स्पर्धांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे आणि ज्ञानाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना हजरत अल्लामा मौलाना मुफ्ती खलीलुर रहेमान यांनी इस्लाममध्ये शिक्षणाचे महत्त्व तसेच महिलांचे स्थान, सन्मान आणि अधिकार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाला प्राधान्य देत आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जफर इकबाल, मेराज सिद्दिकी, नदीम काझी, हाफिज असद, मोहम्मद अकबर अली खान, शेख कलीम, रफत अली खान, डॉ. मोहम्मद समीउल्ला खान, अनिस सिद्दिकी, प्राचार्य सनाउल्ला खान, मुख्याध्यापक सफीउल्ला खान यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.