ABD26J78828 अंतरवाली टेंभी : येथील महिलांनी गोदावरीचे आणलेले पवित्र जल.
......
पावसासाठी महिलांचा महादेवाला जलाभिषेक
रामसगावहून १० किलोमीटर अनवाणी पायाने आणले गंगेचे पवित्र पाणी
अंतरवाली टेंभी, ता. ७ (बातमीदार) ः पावसाने दडी मारल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ चिंतेत आहेत. त्यामुळे अंतरवाली टेंभी येथील महिलांनी अनवाणी पायी सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेल्या रामसगाव येथून गंगेचे पवित्र पाणी आणून गावातील महादेव मंदिरातील शिवलिंगचा जलाभिषेक केला.
गेल्या काही दिवसांपासून परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिकांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. पावसाअभावी शेतातील पिके कोमेजण्याच्या मार्गावर असून शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. अशा परिस्थितीत गावातील महिलांनी पुढाकार घेत रामसगाव येथून गंगेचे पाणी आणले. महादेव मंदिरात विधिवत पूजा-अर्चा करून शिवलिंगावर जलाभिषेक करण्यात आला. यावेळी महिलांनी महादेवाच्या पिंडीवर सातत्याने पाणी अर्पण करत पावसासाठी साकडे घातले. या धार्मिक उपक्रमात गावातील भजनी मंडळाच्या महिलांसह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. भजनी मंडळातील महिलांनी पारंपरिक भजने, अभंग आणि हरिनामाचा गजर केल्याने मंदिर परिसर भक्तिमय झाला. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. महिलांनी सामूहिक प्रार्थना करून लवकरात लवकर समाधानकारक पाऊस पडावा, अशी महादेवाच्या चरणी विनवणी केली. गावातील ज्येष्ठ महिला, भजनी मंडळाच्या सदस्यांसह अनेक महिला या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.