
औरंगाबाद : काही कर्मचारी रूजू, काही संपावर ठाम
वैजापूर : वैजापूर आगारातील संपकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहे. मात्र, मंगळवारी गंगापुरसाठी एक बस सोडण्यात आल्याची माहिती आगार प्रमुख हेमंत नेरकर यांनी दिली.
एसटी महामंडळाचे सरकारीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी ७ नोव्हेंबर रोजी पुकारलेल्या संपाला तब्बल दीड महिना झाला आहे. तरी वैजापूर आगारातील संपकारी आपल्या भूमिकेवर ठाम आहे. या आगारातील २१४ कर्मचारी संपात सहभागी असल्याने आतापर्यंत १७ कर्मचाऱ्यांना निलंबन व २ जणांना बडतर्फ करण्यात आले आहे. त्यामधून ८ कर्मचारी कामावर परत आल्याने एक बस मंगळवारी गंगापुरसाठी सोडण्यात आली होती. दरम्यान, कर्मचारी आपल्या मागण्यावरती ठाम असल्याने वैजापूर आगारातील बस सेवेला पूर्णपणे ब्रेक लागलेले असल्याचे आगार प्रमुख नेरकर यांनी सांगितले.
गंगापूर आगारातून धावतात दोन बस
येथील आगारात नेहमी प्रमाणेच दोन बस धावत असून, वैजापूर व औरंगाबाद शहरात सोडण्यात येत आहेत, अशी माहिती आगार प्रमुख मनीष जवळकर यांनी दिली.
एसटीच्या कर्मचाऱ्यांची संप मिटला असल्याचे सरकारने जाहीर केले असले तरीही येथील बसेस पूर्णपणे सुरू न झाल्याने ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत आहे. आजही तालुक्यातील बहुतांश नागरिक मिळेल त्या खासगी वाहनाने जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहे.
पैठण : एसटी कर्मचारी संपावर ठाम
राज्य सरकारने एसटीचा संप मिटला असल्याचे जाहीर केले असले तरी पैठण येथील एसटी आगाराचे कर्मचारी मात्र, मागणीवर ठाम आहेत. महामंडळाने संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यासाठी अखेरचा दिवस ठरवून दिला होता. कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेतले जाणार होते. मात्र, पैठण आगारांतील एकही कर्मचारी अखेरच्या दिवशीही कामावर हजर झाला नाही. महामंडळाचे शासनात महामंडळाचे शासनात विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत संप मागे नाही, अशी भूमिका संपकऱ्यांनी घेतली आहे. पैठण येथे बसस्थानकात हे उपोषण सुरु आहे. यावर महामंडळाने कर्मचाऱ्यांवर कारवाया केल्या. त्यानंतर पगारवाढ देण्यात आली व आता कर्मचाऱ्यांना कामावर हजर झाल्यास निलंबन मागे घेण्याचा प्रयोगही महामंडळाने केला. मात्र, कर्मचारी काही मागणीवर ठाम आहे. दरम्यान, पैठण बस आगारात ७२ बस असून ११९ चालक व ९५ वाहक आहेत. मात्र, चालक वाहक संपावर असल्यामुळे या आगारांतील बस फेऱ्या सुरुवातीपासूनच बंद पडून आहेत. यामुळे बसस्थानक परिसरात शुकशुकाट पसरला आहे.
सिल्लोड : एकही बस धावली नाही
एसटी संपाचा तिढा सुटण्याची चिन्हे असताना सिल्लोड आगारात मात्र, मंगळवारी (ता.२१) एसटीची चाके एकाच जागी उभी असल्याचे चित्र दिसून आले. सुरू असलेल्या संपातून कनिष्ठ कर्मचारी संघटनेने माघार घेण्याची घोषणा केली. त्यानंतर एसटी पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा नागरिकांना लागली होती. मात्र, मंगळवारी आगारामध्ये एकही कर्मचारी कामावर आला नसल्याने शुकशुकाट होता. त्यामुळे आगारातून दिवसभरात एकही बस बाहेर पडली नाही. याप्रश्नी आगार प्रमुख आनंद चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बुधवार (ता.२२) रोजी कर्मचारी कामावर परततील असा विश्वास व्यक्त केला.