Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरचे पोलिस ठरले सायबर गुन्हेगारांनाही भारी

ऑनलाइन फसवणुकीतील तब्बल ७४ लाख मिळाले परत; ११८ तक्रारदारांचे खुलले चेहरे
  syber crime
syber crime sakal

छत्रपती संभाजीनगर : ऑनलाइन फसवणुकीत सायबर गुन्हेगारांनी गंडा घातला तर ती रक्कम परत मिळणे जवळपास अशक्य असते. मात्र, शहर पोलिस आयुक्तालयातील सायबर पोलिस या गुन्हेगारांनाही भारी ठरले. वेळीच सायबर पोलिसांकडे धाव घेतलेल्या तब्बल ११८ तक्रारदारांचे ७४ लाख रुपये त्यांना परत मिळवून देण्यात आले. ‘हॅपी फेसेस’ या उपक्रमाअंतर्गत वर्षभरात हक्काची रक्कम गमावलेल्या या मंडळींच्या चेहऱ्यावर सायबर सेलने हसू फुलविले.

सध्या कोणत्याही व्यक्तीला अनोळखी मोबाइल क्रमांकावरून कॉल येतो. समोरील व्यक्ती बँकेतून किंवा एखाद्या ऑनलाइन शॉपिंग कंपनीकडून बोलत असल्याची थाप मारते. क्रेडिट कार्ड बंद होणार किंवा लिमिट वाढवून देतो; तसेच अन्य प्रलोभन दाखवून या सायबर भामट्यांकडून ऑनलाइन गंडा घालण्यात येतो. जेव्हा खात्यातून लाखो रुपयांची रक्कम वजा होते तेव्हा तर या व्यक्तीला धक्काच बसतो. फसवणूक झालेली मंडळी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतात. अशा व्यक्तींसाठी सायबर सेलचा ‘हॅप्पी फेसेस’ हा उपक्रम खरेच दिलासा देणारा ठरत आहे.

दरम्यान, वर्षभरात हक्काची रक्कम गेलेल्या ११८ तक्रारदारांचे तब्बल ७४ लाख रिकव्हर करण्यात सायबर सेलला यश आले. यात किमान प्रत्येक तक्रारदाराची रक्कम कमीत कमी एक लाख रुपयांच्याही पुढे आहे.

अशा प्रकारे करतात रिकव्हरीची कारवाई

फसवणूक झालेल्या व्यक्तीच्या तक्रारीची सायबर पोलिस तत्काळ दखल घेतात. त्याचे बँक डिटेल चेक करून ही रक्कम कुठे ट्रान्झॅक्शन झाली, याचा शोध घेण्यात येतो. तांत्रिक विश्लेषण करून समोरील बँक खाते, वॉलेट, मर्चंट याची माहिती मिळवण्यात येते. यानंतर संबंधित बँकेला, वॉलेट कंपनीला मेल करून लगेच ते अकाउंट गोठविण्याचे आदेश देण्यात येतात. आरोपीचे अकाउंट होल्ड किंवा फ्रीझ केल्यानंतर त्याला फ्रॉड करून मिळवलेली रक्कम काढता येत नाही किंवा अन्य खात्यावर वळवतादेखील येत नाही. यानंतर पुन्हा या बँकेशी, कंपनीशी मेलद्वारे संपर्क करून ही रक्कम तक्रारदाराच्या खात्यात, क्रेडिट कार्डमध्ये जमा केली जाते. या कारवाईस काही कालावधी लागतो. मात्र, आरोपीने तत्काळ त्याच्या खात्यातून रक्कम वळती केली आणि तक्रारदारास उशीर झाला, तर मग पोलिसांचादेखील नाइलाज होतो.

यांनी केली कारवाई

सायबर पोलिस ठाणे अंतर्गत ‘हॅपी फेसेस’ या उपक्रमात पोलिस आयुक्त मनोज लोहिया, उपायुक्त अपर्णा गिते, एसीपी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव, सहायक पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर, अमलदार वैभव वाघचौरे, सुशांत शेळके, शाम गायकवाड, सचिन संकपाळ, योगेश तळवंदे, सोनू कुऱ्हाडे, अभिलाष चौधरी, सचिन कदम, छाया लांडगे, जयश्री फुके, हर्षा मेहता, राम काकडे आदी यशस्वीपणे काम पाहत आहेत.

कशा प्रकारे होते फसवणूक?

  • टेलिग्राम सोशल साइटवर जॉबची ऑफर, विविध टास्क देतात

  • अल्प रक्कम सुरुवातीला खात्यात जमा करून नंतर वेगवेगळ्या थापा मारून घालतात लाखो रुपयांचा गंडा

  • क्रेडिट, डेबिट कार्डची माहिती मिळवत फसवणूक

  • महावितरणच्या बिलाची लिंक पाठवून पैसे खात्यातून गायब

  • ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांच्या साइटवरून साहित्य मागवल्यानंतर गिफ्टच्या नावाखाली खिसा होतो खाली

  • विविध लोन ॲपद्वारे बँक खात्याची माहिती घेत फसवणूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com